महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) पहाटे वृद्धापकाळाने निधन झालं. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्याने बुधवारी त्यांना हिंदूजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मनोहर जोशी शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू नेते होते. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळ हळहळलं आहे. जोशी यांच्या निधनाचे वृत्त कळताच उद्धव ठाकरे यांनी आपला नियोजित बुलढाणा दौरा रद्द केला आहे. ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. (Latest Marathi News)
मनोज जोशी यांच्या निधनावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शोक व्यक्त केला आहे. "शून्यातून विश्व निर्माण करणारे.. कडवट महाराष्ट्र अभिमानी अखेरच्या श्वासा पर्यन्त शिवसैनिक म्हणुन जगलेले मनोहर जोशी यांना विनम्र अभिवादन!", असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.
विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील मनोहर जोशी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. "दुःखद! महाराष्ट्राचा 'कोहिनूर' आज पहाटे हरपला. माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा सभापती मनोहर जोशी सरांचे पहाटे निधन झाले.शिवसेनेच्या पहिल्या फळीचे नेते म्हणून पक्ष उभा करण्यात त्यांनी दिलेले योगदान मोठे व अनमोल आहे."
"विशेष म्हणजे शिवसेनेचा झंझावात हा 'शिवसेना काल-आज-उद्या' या पुस्तक रुपात त्यांनी भावी पिढीसमोर मांडण्याचे मोठे कार्यही केले आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो", असं ट्वीट करत अंबादास दानवे यांनी मनोहर जोशी यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी देखील जोशी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. "महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. सरांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला".
"अतिशय नम्र, हजरजबाबी आणि महाराष्ट्र तसेच मराठी माणूस यांच्याविषयी मनापासून तळमळ असलेला नेता आपण गमावला आहे. युती सरकारच्या काळात जोशी सरांच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी मिळाली. कुटुंब प्रमुखाप्रमाणेच कायम त्यांचे मार्गदर्शन लाभले. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो. ॐ शांती", असं ट्वीट गडकरी यांनी केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.