NCP Sharad Pawar Health Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काल अचानक पुण्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे, पार्थ पवार आणि जय पवारही सोबत होते. राजकीय मतभेद बाजूला ठेवून पवार कुटुंबातील हे नातं पाहून सर्वत्र चर्चा सुरू आहे. सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट दिली. (Sharad Pawar latest health update from Ruby Hall Clinic Pune)
सोमवारी सकाळी शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे बारामतीमधून त्यांना तातडीने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते शरद पवार यांना मागील काही दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. त्यातच कफ आणि खोकल्याचा त्रास वाढला. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर शरद पवार यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. रुबी हॉल क्लिनिकमध्ये शरद पवार यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरून त्यांच्या प्रकृतीची अपडेट दिली.
खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट करत शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली. "बाबांना छातीत संसर्ग झाला आहे. त्यांना 5 दिवसांच्या अँटीबायोटिक्सचा कोर्स करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. सुदैवाने, त्यांचे इतर सर्व रिपोर्ट्स सामान्य आहेत, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. तुमच्या शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार. सर्व डॉक्टरांचे मनापासून आभार."
रोहित पवार काय म्हणाले ?
गेल्या काही दिवसांपासून त्यांचे (शरद पवार) शारीरिक परिश्रम होत आहेत. कुठल्या ही कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये येऊ नये. हॉस्पिटल चे सगळे प्रोटोकॉल पाळावेत. आपल्यामुळे इतर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना कुठला ही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. ते आयसीयूमध्ये नाहीत एका खासगी रुममध्ये उपचार घेत आहेत. सध्या त्यांची प्रकृती उत्तम आहे, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.
डॉक्टर काय म्हणाले ?
काही दिवसांपासून शरद पवार यांना हा त्रास जाणवत असावा. शारीरिक परिश्रम झाल्यामुळे त्यांना काहीसा थकवा जाणवत होता आणि खोकला सुद्धा होता. ते सध्या एका खासगी रुममध्ये आहेत, आय सी यू मध्ये नाहीत. काही चाचण्या आम्ही केल्या आहेत त्याचे अहवाल पुढील २ ते ३ तासांत येतील. कुठली ही काळजी करायची गरज नाही, अशी माहिती रूबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर अभिजित लोढा यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.