Mumbai Revenue Week: मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात मंगळवार १ ऑगस्ट २०२३ पासून महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे मंगळवार १ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उद्घाटन होईल. या सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.
महसूल विभागातर्फे नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना त्याचा लाभ घेता यावा, त्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने १ ऑगस्ट या महसूल दिनापासून महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. (Latest Marathi News)
या सप्ताहात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करून महसूल सप्ताहास प्रारंभ होईल. या दिवशी उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येईल. तसेच मिळकत प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येईल. २ ऑगस्टला ‘युवा संवाद’ कार्यक्रम होईल. या दिवशी आपले सरकार केंद्रांची युवकांना माहिती देण्यात येईल. जनजागृतीसाठी प्रभागनिहाय गृहनिर्माण संस्था, महाविद्यालये, अंगणवाडी सेविकांना माहिती देण्यात येईल. अकरावी, बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आवश्यक दाखले, प्रमाणपत्रांची माहिती, शाळा- महाविद्यालयांमध्ये देण्यात येईल. याबरोबरच विविध शिष्यवृत्ती, मतदार नोंदणीबाबत जनजागृती करण्यात येईल.
३ ऑगस्टला ‘एक हात मदतीचा’ हा कार्यक्रम होईल. त्यात नैसर्गिक आपत्ती विभाग, मुंबई महानगरपालिका यांच्या समन्वयाने नैसर्गिक आपत्तीत नागरिकांनी घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन करण्यात येईल. ४ ऑगस्टला ‘जनसंवाद’ कार्यक्रमांतर्गत मुंबई शहर जिल्ह्यातील शासकीय भाडेपट्टेधारकांकरिता भोगवटादार वर्ग- १ सत्ता हस्तांतरण प्रकाराबाबत शिबिराचे आयोजन करण्यात येईल, तर आपले सरकार या पोर्टलवर प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यात येईल.
५ ऑगस्टला ‘सैनिकहो तुमच्यासाठी’ कार्यक्रमात जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाच्या समन्वयातून संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यात येतील. ६ ऑगस्टला महसूल संवर्गातील कार्यरत निवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद कार्यक्रम होईल. त्यातून निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित सेवाविषयक बाबी निकाली काढण्यात येतील. त्यानंतर ७ ऑगस्टला या सप्ताहाचा समारोप होईल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.