'आमच्या सगळ्यांकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. भाजपचे तिन्ही उमेदवार याठिकाणी विजयी झाले आहेत. सगळ्यात आधी हा विजय आहे तो मी आमचे लढवय्ये आमदार लक्ष्मण जगताप यांना आणि मुक्ता टिळक यांना समर्पित करतो. अॅम्ब्युलन्समधून मोठा प्रवास करून ते इथपर्यंत आले. माझ्या पक्षासाठी मी येणारच असे ते म्हणाले होते आणि ते आले. त्यांचे मी आभार मानतो. मुक्ता टिळक यांचेही आभार मानतो. हा विजय हा सर्वार्थाने महत्वाचा आहे. राज्यातील जनतेने भाजपला कौल दिला होता. पण तो कौल आमच्या पाठीत सुरा खुपसून काढून घेतला होता. पीयूष गोयल, बोंडे यांना प्रत्येकी ४८ मते मिळाली. धनंजय महाडीक यांना ४१.५६ मते मिळाली. ती संजय राऊत यांच्यापेक्षाही जास्त आहेत. जे मत शिवसेनेचे बाद झाले, ते ग्राह्य धरले असते तरी आमचा विजय झाला असता. मलिक यांना कोर्टानं परवानगी दिली असती तरी आमचा विजय झाला असता. आम्हाला मतदान करणाऱ्या सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो. हा विजय महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित करतो. जे स्वतःला महाराष्ट्र, मुंबई समजतात. त्यांना या विजयाने लक्षात आणून दिले. महाराष्ट्र म्हणजे १२ कोटी जनता, मुंबई म्हणजे मुंबईतील जनता आणि मराठी म्हणजे आम्ही सगळे आहोत, हे दाखवून दिले आहे. विजयाची मालिका सुरू झाली आहे.'
सहाव्या जागेचा सस्पेन्स संपला, भाजपचे धनंजय महाडीक विजयी झाल्याचे वृत्त
'सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार आणि पक्षाचे आमदार, सहकारी आणि कार्यकर्ते यांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी मला राज्यसभेवर जाण्याची पुन्हा संधी दिली आहे. चौथ्यांदा राज्यसभेवर निवडून आलो. महाराष्ट्राची देशाची सेवा करण्याची संधी मिळाली. येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या आणि देशाची सेवा करेन. या निवडणुकी रस्सीखेच होती. अनेक अंदाज लावले गेले. पहिल्या फेरीचा निवडणुकीचा निकाल लागला आहे. मला ४३ मते मिळाली आहेत. मला खात्री आहे की महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील. पहिल्या पसंतीचे पाच उमेदवार निवडून आले आहेत. संजय पवार यांना ३३ मते आहेत. महाडीक यांना २६ मते आहेत. अजून दुसऱ्या पसंतीची मोजणी झाल्यानंतर निकाल लागेल. जवळपास महाविकास आघाडीला समर्थन करणाऱ्या सर्वांनी आमच्या बाजूने मतदान केले आहे. माझ्या आणि पक्षाच्या वतीने मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. चांगले काम करण्याचा संकल्प आहे.'- प्रफुल्ल पटेल
प्रफ्फुल पटेल - ४३ मते
शिवसेनेचे संजय राऊत - ४२ मते
पीयूष गोयल - ४८ मते
अनिल बोंडे - ४८ मते
प्रतापगढी - ४४ मते
मतमोजणीला सुरुवात झाली. छाननीनंतर सर्वच्या सर्व २८४ मते वैध ठरवण्यात आली आहेत.
विधानभवन परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ झाली आहे. सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढलं जात आहे.
सुहास कांदे यांचे मत बाद झाले असेल असे मला वाटत नाही. मी माहिती घेतो. जर कुणी असे मत बाद करत असेल तर न्यायालय आहेच- एकनाथ शिंदे
निवडणूक आयोगाकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना ऑर्डर मिळाली. मतमोजणी सुरू, आमदार सुहास कांदे यांचे मत बाद, २८४ मतांचीच आता मोजणी होणार
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या अहवालावर अद्यापही निर्णय झालेला नाहीय. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतमोजणी रोखून ठेवली आहे. तपासासाठी मतदान केंद्रावरील चित्रीकरण केंद्रीय निवडणूक आयोगाने मागवले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाकडे मागितले मतदानाच्या चित्रीकरणाची मागणी केली आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी आज 3.30 वाजेपर्यंत विधानसभेच्या २८५ सदस्यांनी मतदान केले आहे. दरम्यान, थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार असून सर्व उमेदवारांसह नेतेमंडळी निकालाच्या प्रतिक्षेत आहेत.
राज्यसभा निवडणुकीसाठी आज 3.30 वाजेपर्यंत विधानसभेच्या २८५ सदस्यांनी मतदान केले आहे. शिवसेनेकडून सचिव मिलिंद नार्वेकर तर भाजपकडून प्रसाद लाड बविआ च्या आमदारांना नेण्यासाठी आले होते. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात बहुजन विकास आघाडीच्या तीन सदस्यांनी मतदान केले. मात्र, बहुजन विकास आघाडीने कोणाला मतदान केले ? हे मात्र गुलदस्त्यातच आहे. दरम्यान, आज सायंकाळी पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी दुपारी दोन वाजेपर्यंत 281 आमदारांनी मतदान केले आहे.
माकपचे आमदार विनोद निकोले यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. महाविकास आघाडीच्या बाजूने त्यांनी मतदान केलंय. मुख्यमंत्री यांनी विकास निधी वाढवून देतो असं आश्वासन दिल्या नंतर पक्ष श्रेष्ठींनी दिलेल्या आदेशानुसार हे मतदान महाविकास आघाडीला केल्याची भूमिका निकोले यांनी मांडली आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी जितेंद्र आव्हाड यांनी मतदान केल्यानंतर थेट जयंत पाटील यांच्या हातात मतपत्रिका दिली. खरं तर मतपत्रिका दाखवायची असते ती हाताळायला द्यायची नसते यावर भाजपचे पराग अळवणी यांनी हरकत घेतली होती. तसेच काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनीही अशाच पद्धतीने नाना पटोले यांच्या हातात मतपत्रिका दिली या दोन्ही मुद्द्यांवर भाजपने हरकत घेतली आहे. ही दोन्ही मतं बाद करावी अशी भाजपची मागणी आहे. मात्र ही मागणी निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळली आहे. आतापर्यंत झालेली सर्व मंत वैध आहेत असं निवडणूक अधिकारी म्हणाले आहेत.
राज्यसभा निवडणूकीसाठी आज विधानभवनात दुपारी १२.२५ वाजेपर्यंत २३८ आमदारांनी मतदान केले आहे.
राज्यसभा निवडणूकीत मतदान करण्यासाठी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील मतदानासाठी रवाना डोंबिवलीहून मुंबईला रवाना झाले आहेत. महाविकास आघाडीकडून कुणी विचारणा केली नसल्यानं मनसेचं एकमेव मत हे भाजपकडे जाण्याची दाट शक्यता आहे.
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी आणि रईस शेख मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विधानभवन दाखल झाले आहेत. सपाचे हे दोघेही आमदार महाविकास आघाडील मत देणार असं म्हणाले आहेत. आमचं मत सेक्युलरला आहे. आमचं मत भाजपच्या विरोधात आहे अशी प्रतिक्रिया सपाचे आमदार रईस शेख यांनी दिली आहे.
खेडचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते-पाटलांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीने बैठक घेतली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल पटेल, अजित पवार यांच्या सोबत ही बैठक सुरू आहे. दिलीप मोहिते-पाटलांनी जाहिरपणे नाराजी व्यक्त केली होती, ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरू आहे.
न्यायालयीन कोठडीत असलेल्या नवाब मलिकांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर हायकोर्टही ठाम आहे. नवाब मलिकांना मतदानाचा हक्क कोर्टानं नाकारला आहे. आता या याचिकेतील जामीनाचा मुद्दा काढून केवळ पोलीस बंदोबस्तात मतदान करण्याची परवानगी मिळवी अशी मागणी मलिकांचे वकिल करणार आहेत.
संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाला (Rajya Sabha Election voting) सुरूवात झाली आहे. आतापर्यंत राज्यसभेसाठी 50 टक्के मतदान झालं आहे. अशातच हे मतदान सुरू झालेलं असतानाच महाविकास आघाडीला मोठा झटका बसला आहे. अनिल देशमुखांची यांची सुनावणी घेण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना राज्यसभेत मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. सध्या नवाब मलिक यांच्या अर्जावर सुनावणी सुरू आहे. मलिकांना राज्यसभेत मतदानाचा हक्क बजावता येणार की नाही हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे.
सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर मलिक यानी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई सत्र न्यायालयाने मलिक याची राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी यासाठी केलेली याचिका काल फेटाळली आहे. आता सुरु असलेल्या सुनावणीत मलिक यांचे वकिल अमित देसाई युक्तीवाद करत आहेत. अमित देसाई यांनी मलिक यांना तात्पुरता जामीन किंवा पोलीस बंदोबस्तात मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी परवानगी मागितली पण, तुम्ही फार कमी वेळात दाद मागायला आला आहात असं न्यायाधीशांनी म्हटलं आहे.
भाजपच्या आमदार आणि पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक या मतदान करण्यासाठी रुग्णवाहिकेतून विधानभवनात पोहोचल्या आहेत. मुक्ता टिळक या गेल्या काही काळापासून आजारी आहेत. त्यामुळे त्यांना मतदान करण्यासाठी स्ट्रेचरवरुन आणण्यात आलं. राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्मण जगताप हे देखील आजारी असून तेही अशाचप्रकारे मतदानासाठी आले आहेत.
राज्यसभा निवडणुकीसाठीचं मतदान सुरू आहे. अशात महाविकास आघाडीचे दोन मंत्री न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना मतदान करण्यास ईडीने आक्षेप घेतला होता. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या सुनावणीकडे महाविकास आघाडीचे लक्ष लागलेलं आहे. या दोन्ही नेत्यांना मतदान करता येणार की नाही हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.
राज्यभेच्या सहा जागांसाठी आतापर्यंत ५० टक्के मतदान झालं आहे. यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि भाजप आणि अशा सर्व पक्षांच्या १४३ आमदारांनी आपलं मत मतपेटीत टाकलं आहे.
भाजपा-१०६ , शिवसेना -५५ , राष्ट्रवादी- ५३, काँग्रेस-४४, अपक्ष आणि छोटे पक्ष - २९
राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात एकुण सात उमेदवार आहेत.
प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी), संजय राऊत (शिवसेना), पीयूष गोयल (भाजपा), इम्रान प्रतापगढी (काँग्रेस), अनिल बोंडे (भाजपा), संजय पवार (शिवसेना), धनंजय महाडिक (भाजपा)
राज्यसभेच्या निवडणूकीत महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसेच महाविकास आघाडीत कोणतीही नाराजी नाही. विरोधी पक्षाकडून चूकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
एकीकडे राज्यसभा निवडणूकीसाठी मतदान सुरू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २३ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. आज सकाळी १०:१० मिनिटांनी बेलार्ड पिअर येथील पक्ष कार्यालयात झेंडा वंदन करण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, नेते एकनाथ खडसे, हेमंत टकले, राखी जाधव इत्यादी नेते उपस्थित होते.
राज्यसभा निवडणुकीसाठीमतदान सुरू झालं आहे. शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार हे निवडणूक लढवत आहेत. याबाबत भाजपाचे उमेदवार अनिल बोंडे यांनी एक भाकित केलं आहे. अनिल बोंडे यांनी विधीमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे की, महाभारतात ज्याप्रमाणे अश्वत्थामा गेला तसं या निवडणुकीत कोणीतरी एक संजय जाणार हे नक्की आहे असं भाकित त्यांनी केलं. यावेळी " आम्ही १०० टक्के विजयी होऊ." असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
पुण्यातील भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप गंभीर आजाराने त्रस्त असतानाही मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव लक्ष्मण जगताप मतदान प्रक्रियेत सहभागी होणार की नाही असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून होता. अखेर ते रुग्णवाहिकेतून मुंबईसाठी रवाना झाले आहेत.
राज्यसभा निवडणूकीसाठी महाविकास आघाडीने आपल्या रणनीतीत बदल केला आहे. मविआ पहिल्या टप्प्यात ४२ मतं देणार आहे. त्यानंतर दुपारी मतदानाचा आढावा घेऊन अधिकची दोन मते देण्यात येणार म्हणजे ४४ मतं देण्यात येणार आणि त्यातून उरलेली मत ही शिवसेनेच्या संजय पवार यांना देण्यात येणार आहे.
राष्ट्रवादीने आपल्या मतदानाता कोटा वाढवल्यानंतर काँग्रेसने देखील कोटा वाढवला असून, तो ४४ केला आहे. याचबरोबर शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना धोका वाढल्याचं दिसत आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने ३ पोलिंग एजंट आणि २ ऑब्झर्व्हर नेमले आहेत. या पाच जणांच्या मदतीला आणखी ६ जण असणार आहेत. अशा एकूण ११ जणांची टीम आमदारांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यरत आहेत. तर मत मोजणीला ३ नेते असतील. प्रसाद लाड, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, पराग अळवणी आणि योगेश सागर हे मतदानावर लक्ष ठेवणार आहेत. भाजपा आमदार टप्प्याटप्प्याने मतदान करणार आहे. त्यासाठी भाजपाने ३५ आमदारांचे गट केले आहेत. भाजपकडून पहिलं मत विजय कुमार गावित यांनी दिलं आहे.
राज्यसभा निवडणूकीत काँग्रेसकडून मतदान अधिकारी म्हणून बाळासाहेब थोरात भूमिका बजावणार आहेत. काँग्रेस चार आमदारांच एक गट तयार करणार आणि तसे गट मतदान करणार. यावेळी मतमोजणीला काँग्रेसकडून सतेज पाटील आणि सुनील केदार उपस्थित असणार आहेत.
पहिल्या टप्प्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ४२ मतदान करणार आहेत, तर बाकीची मतं राखून ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी झालेल्या मतदानाचा आढावा घेऊन उरलेली सगळी मत शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना देणार आहेत. म्हणजे सरसकट महाविकास आघडीते चारही उमेदवार निवडून येतील अशी रणनीती या तिन्ही पक्षांनी बनवली आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी आज होत असलेल्या मतदानात सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचं मतदान सुरु आहे. छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादीच्या २० आमदारांचं आतापर्यंत मतदान झालं आहे.
राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते नाराज असल्याची माहिती मिळत आहे. खेड-आळंदीचे आमदार दिलीप मोहिते यांनी ऐन मतदानाच्या दिवशी आपली नाराजी व्यक्त केली आहे. आमच्याकडे दुर्लक्ष झालं अशी खदखद मोहितेंनी व्यक्त केली आहे. आमच्या प्रकल्पांकडे, कामांकडे सरकारचं लक्ष नाही असा आरोप त्यांनी केला. दिलीप मोहिते यांची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडून त्यांना आश्वासन देण्यात आलं आहे. त्यानंतर "मतदान करतो मात्र कामं करा" अशी मागणी दिलीप मोहिते यांनी केली आहे.
राज्यसभा निवडणूकीसाठी विधानभवनात मतदानाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी पहिलं मत टाकून मतदानाला सुरुवात झाली आहे. २४ वर्षांनंतर महाराष्ट्रात राज्यसभा निवडणूक होत आहे.
७ व्या उमेदवारामुळे ६ व्या जागेसाठी निवडणूक चांगलीच रंगली आहे. राज्यसभा निवडणूकीसाठी मतदानाला सुरुवात झाली असून भाजप, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार विधान भवनात पोहोचले आहे. शिवसेनेच आमदार अद्यापही हॉटेलमध्येच आहेत.
महाविकास आघाडीचे चारही उमेदवार १००% निवडून येतील असा विश्वास अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.
MIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी काल रात्री १ वाजता ट्रायडंट हाँटेलमध्ये येऊन शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेतली आणि राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शवला. एमआयएमचा शिवसेनेला विरोध असला तरी MIM कॉंग्रेसला मतदान करुन महाविकास आघाडीला मदत करणार आहे.
एमआयएम आणि शिवसेना यांची विचारसरणी वेगळी आहे. त्यामुळे एमआयएमचा शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा मिळणं कठीण आहे. त्यामुळे एमआयएमची दोन मतं काँग्रेस, राष्ट्रवादीला मिळतील आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक आमदार शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करेल, असा तोडगा निघत असल्याचं दिसत आहे. यासाठी एक पत्रक काढलं जाईल. त्यात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचं नाव असेल. मात्र शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचं नाव नसेल.
राज्यसभा निवडणुकीत एक-एक आमदाराचं मत महत्वाचं ठरणार आहे. अशातच निवडणुकीत नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना न्यायालयाने मतदानाला परवानगी नाकारल्याने आघाडीचे दोन मतांचे गणित बिघडले आहे. दुसरीकडे या मतांची कमतरता ते अपक्ष आमदारांच्या मतदानावरून भरून काढतील अशी अपेक्षा होती. मात्र, हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाची तीन मते महाविकासआघाडीला मिळतील याबाबत सांशकता आहे.
आज राज्यसभेच्या जागांसाठी सकाळी ९ ते ४ या वेळेत मतदान होणार आहे. तर संध्याकाळी ५ वाजेपासून मत मोजणीला सुरूवात होणार आहे. या निवडणुकीत विधानसभेचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी मतदार असतात. मात्र एका आमदाराचं निधन झालं आहे. तर दुसरीकडे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना कोर्टाने मतदानाचा अधिकार दिलेला नाही. त्यामुळे २८५ मतदार सहा जागांसाठी मतदान करतील.
मुंबई : राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) सहा जागांसाठी आज म्हणजचे शुक्रवारी मतदान होणार आहे. २४ वर्षानंतर राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीत अशा प्रकारे मतदान होत असल्याने कमालीची चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत घोडेबाजार होणार असा आरोप सत्ताधाऱ्यांसह (Shivsena) विरोधकांनी (BJP) एकमेकांवर केला होता. त्यामुळे प्रत्येकाने आपआपले आमदार एका सुरक्षित ठिकाणी ठेवले होते. दरम्यान, या निवडणुकीत नेमका कोणता पक्ष बाजी मारणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Rajya Sabha Eection 2022 Latest Updates)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.