पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी
भगवान जगन्नाथ रथयात्रेनिमित्त वाहतुकीत मोठा बदल
दुपारी १ ते सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत वाहतुकीत बदल
पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन
पुणेकरांनो रविवारच्या सुट्टी निमित्त घराबाहेर पडणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. भगवान जगन्नाथ रथयात्रेनिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत दुपारी १ ते सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक विभागाने नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. रथयात्रेच्या मार्गावरील काही प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचे निर्बंध लागू राहणार असल्याने वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करून घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यंदाची भगवान जगन्नाथ रथयात्रा एस. पी. कॉलेज येथून सुरू होणार असून त्याच ठिकाणी तिची सांगता होणार आहे. रथयात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली आहे. वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अलका चौकाकडून स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनी अलका चौक, शास्त्री रोड, सेनादत्त चौक आणि मांगीरबाबा चौक या पर्यायी मार्गाचा वापर करावा. तसेच पुरम चौकाकडून डेक्कनकडे जाणाऱ्या वाहनांना बाजीराव रोड टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
बाजीराव रोडवरून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पुरम चौक, टिळक रोड आणि अलका चौक असा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. याशिवाय बेलबाग चौकाकडून लक्ष्मी रोडमार्गे टिळक चौकाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनी सेवासदन चौक, आप्पा बळवंत चौक आणि शनिवार वाडा मार्गे प्रवास करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, शगुन चौक ते ओंकारेश्वर पुल या दरम्यान रथयात्रा सुरू असताना या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद अथवा वळविण्यात येऊ शकते.
त्यामुळे या परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी नदीपात्र रस्ता किंवा लक्ष्मी रोडचा वापर करावा, असे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे. रथयात्रेदरम्यान शहरातील विविध भागांत वाहतुकीचा वेग मंदावण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भाविकांच्या उत्साहात आणि सुरक्षिततेत कोणतीही बाधा येऊ नये यासाठी पोलिसांकडून विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.