Pune Politics Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

Pune Municipal Corporation: पुणे महानगर पालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधील वाद वाढत चालला आहे. ज्येष्ठ नेत्यांवर आरोप केल्यामुळे भाजपच्या जिव्हारी लागले आहे.

Priya More
  • पुणे महापालिकेत भाजप- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये टोकाचा वाद

  • १२ कोटींच्या निधीवरून दोन्ही पक्षात वाद सुरू

  • अमोल बालवडकर यांच्या टीकेनंतर भाजप राष्ट्रवादी संघर्ष आणखी पेटला

  • सुहास टिंगरे यांच्या निधीवरून पुणे महापालिकेत राजकीय वाद

  • गणेश बिडकर यांचे सुनेत्रा पवार यांना पत्र

अक्षय बडवे, पुणे

पुणे महापालिकेतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आला आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिलेल्या पत्राला अनुमोदक म्हणून नगरसेवक सुहास टिंगरे यांनी स्वाक्षरी केल्याने त्यांच्यावरही भाजपने राग काढला आहे. महापालिकेत झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत टिंगरे यांच्या ‘स’ यादीतील १२ कोटी रुपयांचा निधी भाजप नगरसेवकांच्या प्रभागात वळविण्यात आला आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीतील संघर्ष आणखी पेटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दोन्ही पक्षांमध्ये उद्भवलेला संघर्षाला मात्र फक्त पालिकेतील गोष्टी कारणीभूत नसून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला "पॉलिटिकल व्हेंडेटा" म्हणेजच राजकीय वैर आहे हे देखील अधोरेखित झालंय. मुळात, "योग्य न्याय आणि अश्वानांची पूर्ती" न झाल्याने एकेकाळी भाजप चे अमोल बालवडकर यांनी ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला आणि पुणे शहरातील प्रभाग ९ मधून निवडून सुद्धा आले. निवडणुका संपल्यानंतर सुद्धा मात्र अनेक वेळा बालवडकर यांनी भाजप ला शब्दशः डिवचले तर भाजप ने सुद्धा सोशल मीडियावरून बालवडकर यांच्या वर टीकास्त्र सोडण्यात पिछेहाट दाखवली नाही.

बालवडकर विरुद्ध भाजप संघर्षाची उदाहरणे -

- विधानसभेला भाजप ने तिकीट नाकारल्याने अमोल बालवडकर यांची प्रथम नाराजी

- पुणे महापालिका निवडणुकीला सुद्धा भाजप बालवडकर यांना डावलण्याचा तयारीत

- बालवडकर यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश करून मारली बाजी

- राष्ट्रवादीत प्रवेश करताच बालवडकर यांची थेट पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर आक्रमक टीका

- भाजपच्या सोशल मिडिया सेल ने बालवडकर यांचे कार्टून तयार करून केले "ट्रोल"

- कोथरूडच्या विकास कामांच्या नावाखाली आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील बालवडकरांचे "टार्गेट"

- गुरु पौर्णिमेला थेट चंद्रकांत पाटील आणि भोंदू अशोक खरात सोबत यांचा एकत्रित फोटो बालवडकर यांनी पोस्ट करत केली टीका

- चंद्रकांत पाटील यांनी मात्र बालवडकर यांच्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी अनेक वेळा माध्यमांना टाळले

- पुण्यात झालेल्या तिरंगा रॅली विरोधात बालवडकर यांनी घेतला आक्षेप

- चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघातील विकासकामांची चौकशी करण्याची मागणी

बालवडकर यांचा थेट महापालिकेसमोर प्रस्ताव

कोथरूड विधानसभा निवडणुकीपूर्वीपासून बालवडकर आणि चंद्रकांत पाटील यांच्यात राजकीय वैर निर्माण झाले होते. त्यातूनच बालवडकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून झालेल्या विकास कामांची चौकशी करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत दिला होता. भाजपने हा प्रस्ताव दप्तरी दाखल केला आणि महापालिकेच्या अर्थसंकल्पात बालवडकर यांना ‘स’ यादीतून दिलेला १२ कोटी रुपयांचा निधी काढून घेतला. बालवडकर यांच्या पत्रावर सुहास टिंगरे यांची स्वाक्षरी होती, त्यामुळे भाजपने त्यांच्याकडे मोर्चा वळवला.

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघर्षाची सुरुवात राष्ट्रवादी चे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पुणे महापालिकेला ठराव मंजूर करण्यासाठी पाठवलेल्या अर्जावरून झाला. कोथरूड विधानसभा मतदारसंघात पुणे जिल्हा नियोजन समिती आमदार स्थानिक विकास कार्यक्रम तसेच इतर उपलब्ध विकास निधीतून पुणे महापालिकेतर्फे राबविण्यात आलेल्या विविध विकास कामाबाबत तक्रारी येत असल्याचे मत बालवडकर यांनी मांडले. तसेच कोथरूड विधानसभा मतदारसंघात असलेल्या ४ जलतरण तलावाबाबत या तक्रारी असल्याचं त्यांनी पत्राद्वारे महापालिकेला कळवले. या विकास कामांची सखोल चौकशी व लेखा परीक्षण म्हणजेच स्पेशल ऑडिट करून या प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष व कालबद्ध चौकशी करून तिचा अहवाल स्थायी समितीसमोर निश्चित कालावधीत सादर करण्यात यावा अशी मागणी बालवडकर यांनी केली होती.

बिडकर यांचे थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र

पुणे महापालिकेतील वाद थेट पक्षाच्या नेत्यांपर्यंत पोहचला आहे. महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना निधी दिला आहे, महापालिकेच्या सभागृहात भाजपपेक्षा जास्त त्यांना बोलण्याची संधी मिळाली आहे. असे असतानाही बालवडकर यांच्याकडून भाजपच्या नेत्यांवर, सरकारच्या उपक्रमावर कायम चिखलफेक होत आहे. बालवडकरांचे वर्तन अहंकारी, हेकेखोर आहे. त्यामुळे बालवडकर आणि सुहास टिंगरे यांचा निधी काढून घेतला आहे, असे बिडकर यांनी पत्रात नमूद केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही बिडकर यांनी हे पत्र पाठवले आहे.

बिडकर यांच्या पत्राला बालवडकर यांचे उत्तर

सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिलेल्या पत्राला अमोल बालवडकर यांनी उत्तर देत भाजपवर जोरदार टीका केली. की ज्या व्यक्तीने महापालिकेच्या भर सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धमकावण्याचा प्रयत्न केला आणि "आपली युती फक्त राज्यात आहे, पुणे महापालिकेत नाही" अशी जाहीर वक्तव्ये केली, त्या गणेश बिडकरांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांना पत्र लिहिण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही असं बालवडकर म्हणाले.

वाद शमणार का मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री समजूत घालणार?

सभागृह नेते यांनी हा सगळा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसऱ्या बाजूला महापालिकेतील घडलेल्या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सुद्धा माहिती घेतली. महापालिकेच्या नगरसेवक यांच्यामधील वाद आता राज्याच्या दोन प्रमुख नेत्यांच्या दारी जाऊन पडला आहे. त्यामुळे नेमका हा वाद आता शमणार का एका मोठ्या वादळाची ही छोटी सुरुवात आहे हे येणारा काळच ठरवेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Shivsena Dispute : ...तर ठाकरे-शिंदे एकत्र येऊ शकतात; शिंदेसेनेच्या बड्या नेत्याचं भाकित, EXCLUSIVE

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा ‘नाशिकची स्पेशल मिसळ थाळी’; चव अशी की पोट भरून खातील! 

Marathi LanguageRule: मुजोरी कराल तर आयुष्यभरासाठी लायसन्स रद्द करू, प्रताप सरनाईकांचा रिक्षा-टॅक्सी चालकांना इशारा

SCROLL FOR NEXT