पुण्यात ३० लाखांच्या लूट प्रकरणात वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलंबित
पुण्यात दारूच्या नशेत कार चालवल्याप्रकरणी महिला पोलिस कर्मचारी निलंबित
२ पोलिसांच्या तडकाफडकी निलंबनाने पुणे पोलिस दलात खळबळ
पुण्यामध्ये एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यासह एका महिला पोलिस कर्मचाऱ्याचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले. यामुळे पुणे पोलिस दलात खळबळ उडाली. पुण्यातील मार्केटयार्ड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचे निलंबन करण्यात आले. या पोलिस अधिकाऱ्याने ३० लाखांच्या दरोड्याचा गुन्हा 'मिसिंग' म्हणून नोंदविला. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. तर दुसऱ्या प्रकरणात महिला पोलिस कर्मचाऱ्याने दारूच्या नशेत कार चालवली. स्थानिकांनी तिला जाब विचारला असता तिने त्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे तिचे देखील निलंबन करण्यात आले.
पुण्यातील सॅलसबरी पार्क भागात श्रवण देवासी आणि गणपत देवासी हे व्यापारी दुचाकीवरून हवालाची ३० लाख रुपयांची रक्कम घेऊन जात होते. यावेळी २ तरुणांनी त्यांची दुचाकी अडवली आणि यातील एकाने त्या दोघांच्या डोळ्यावर स्प्रे मारला. यावेळी दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी बॅग हिसकावून तिथून पळ काढला. या प्रकरणी व्यावसायिकाने मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावेळी सीसी टीव्ही फुटेज तपासून गुन्हा दाखल करू असं फिर्यादी यांना सांगण्यात आले. फिर्यादी यांनी अनेकवेळा या घटनेचा पाठपुरावा केला मात्र ९ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी प्रॉपर्टी मिसिंगचा गुन्हा दाखल केला.
दरम्यान, स्वारगेट पोलिसांनी लूटमारीच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी मार्केटयार्डमध्ये ३० लाख रुपये चोरल्याची कबुली दिली आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला. दखलपात्र गुन्ह्याची तक्रार घेऊन कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित असताना तक्रारदाराला घरी पाठवून दिल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर आता मार्केटयार्ड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांचे निलंबन करण्यात आले आहे.
दारूच्या नशेत पोलिस गणवेश परिधान करून विनानंबर प्लेटची कार विरुद्ध दिशेने चालवणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पुण्यातील मांजरी परिसरात घडलेल्या या प्रकाराचा व्हिडीओ नागरिकांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केल्यानंतर पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेतली. संबंधित महिला कर्मचाऱ्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली. ही घटना मंगळवारी पहाटे घडली. संबंधित ३९ वर्षीय महिला पोलिस कर्मचारी काळेपडळ पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.
विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणारी कार पाहून इतर वाहनचालकांनी आपली वाहने थांबवली. नागरिकांनी कारचालक महिलेला जाब विचारला असता ती दारूच्या नशेत असल्याचे आणि पोलिस गणवेशात असल्याचे समोर आले. यावेळी नागरिकांनी या घटनेचे चित्रीकरण करून व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित केला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला कर्मचारी रजेवर होत्या. रविवार आणि सोमवार असे सलग दोन दिवस त्या कर्तव्यावर उपस्थित नव्हत्या. रजेच्या कालावधीत पोलिस गणवेश परिधान करण्याची परवानगी नसल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्या बंडगार्डन परिसरात मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी करून परतत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.