अक्षय बडवे, पुणे | साम टीव्ही
pune killing case solved in 12 hours : आयुष्यात एक तरी मित्र असावा....या ओळी काळजाचा ठाव घेतात. आत्मविश्वास वाढवतात. आयुष्यात मोठी झेप घ्यायची प्रेरणा देतात. मैत्रीच्या नात्याचं महत्व सांगतात. पण हीच मैत्री जिवावर उठली तर...? पुण्यातील वारजे भागात अशीच मैत्रीचा घात करणारी घटना उघडकीस आली आहे. मित्रानं दुसऱ्या एका व्यक्तीला १८ लाख रुपये दिले होते. ते पैसे वसूल करून देतो असं सांगून मित्रानंच ११ लाख रुपयांची 'वसुली' केली. आता हे पैसे परत द्यावे लागतील म्हणून मित्राचाच काटा काढला. मित्राला निर्दयीपणे संपवलं. मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा उलगडा अवघ्या १२ तासांत झाला. आरोपीचं नाव समोर आल्यानंतर सगळेच हादरून गेले.
पैशांच्या वादातून मित्राने साथीदारांच्या मदतीने मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. आरोपी मित्र त्याची हत्या करूनच थांबला नाही, तर ओळख पटू नये म्हणून त्याच्या डोक्यात दगड घातला आणि चेहरा विद्रुप केला. राजेंद्र सुभाष ऐलगच्चे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो आंबेगावच्या स्वराज आर्केड येथील राहणारा होता. टेकडीवर त्याचा मृतदेह आढळला होता. सुरुवातीला त्याची ओळखच पटली नव्हती. कोणताही पुरावा नसताना पोलिसांच्या पथकानं मृताची ओळख पटवली. त्यानंतर तपासाची चक्रे वेगानं फिरवून अवघ्या १२ तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
राजेंद्रची निर्घृणपणे हत्या करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. नांदेड सिटीत राहणारा शुभम राजेश शिंदे, खडकीत राहणारा लकी सुरेंद्र सिंग, कर्वेनगर येथील हिंगणे होम कॉलनीजवळील झोपडपट्टीत राहणारा सुनील संतोष खलसे उर्फ एस. के या अवघ्या विशी-पंचविशीतल्या तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत. यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. वारजेतल्या आकाशनगराजवळच्या टेकडीवर निर्जन ठिकाणी २३ जानेवारीला वारजे पोलिसांना राजेंद्रचा मृतदेह सापडला होता. त्याच्या शरीरावर जखमा होत्या. दगडानं डोकं ठेचलं होतं. चेहरा विद्रुप करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवला होता.
या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना टीप मिळाली. गणपती माथा ते शिंदे पूल वारजे या ठिकाणी दोन संशयित तरूण थांबले आहेत. त्यांनी कोणता तरी गुन्हा केला असावा, असं त्यांच्या हालचाली आणि बोलण्यावरून वाटत होतं. पोलिसांनी तात्काळ शोध सुरू केला. संशयितांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी केली. चौकशीत आणखी दोघांची नावं समोर आली. त्या दोघांनाही ताब्यात घेतलं.
राजेंद्रनं एकाला दिलेले १८ लाख वसूल करून देण्याचा शब्द शुभम शिंदेनं त्याला दिला होता. शुभमनं त्याच्याकडून ११ लाख रुपये घेतले. ते पैसे राजेंद्र शुभमकडं मागत होता. आता राजेंद्रलाच संपवलं तर पैसे द्यावेच लागणार नाहीत, असं शुभमच्या मनात आलं. त्यानुसार कट आखला. साथीदारांना मदतीला घेतलं. राजेंद्रला वारजेच्या शनी मंदिर टेकडी येथे २१ जानेवारीला रात्री साडेआठच्या सुमारास बोलावलं. राजेंद्र तेथे गेला. शुभम आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर शस्त्रांनी वार केले. डोक्यात दगड घातला. चेहरा विद्रुप केला, अशी माहिती चौकशीत समोर आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.