गोपाल मोटघरे, साम टीव्ही
बंटी और बबली या चित्रपटातील कथानकालाही लाजवेल अशी जावई-सासूची कथा रिअल लाइफमध्ये उघडकीस आली आहे. जावई महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरायचा आणि कहर म्हणजे त्याची सासू चोरून आणलेली सोनसाखळी विकायची. रेकॉर्डवरील या 'बंटी' आणि 'बबलीच्या आई'ला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून १२ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
'जावई माझा भला' असं प्रत्येक सासूला वाटत असतं. पण पिंपरी - चिंचवडमध्ये 'जावई चोर आणि सासू शिरजोर' असाच काहीसा अजब प्रकार उघडकीस आला आहे. पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांनी 'नंबरी जावई आणि दस नंबरी सासू'ला बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे दोघेही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती उघड झाली आहे.
पोलिसांच्या तपासात चक्रावणारी बाब समोर आली आहे. महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हा अट्टल चोर असलेला जावई चोरायचा. तर त्याहून धक्कादायक बाब म्हणजे त्याची सासू ती चोरून आणलेली सोनसाखळी विकायची. पोलिसांनी या जावई आणि सासूच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
सादिक शमल खान इराणी असं सोनसाखळी चोरणाऱ्या जावयाचे नाव आहे. तर नर्गिस जाफर इराणी असं चोरीची सोनसाखळी विकणाऱ्या सासूचे नाव आहे.
पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने आरोपी जावई आणि सासूने केलेले आठ सोनसोखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या दोघांकडून १२ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सादिक शमल खान इराणी आणि नर्गिस जाफर इराणी हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
सादिक समल खान इराणी हा निर्जनस्थळावरून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरायचा. दुचाकीवरून यायचा आणि मागे बसलेल्या साथीदाराच्या मदतीने महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पोबारा करायचा. चोरलेल्या सोनसाखळ्या त्याची सासू नर्गिस जाफर खान इराणी विकायची, असं पोलीस तपासात उघडकीस आलं आहे. गुन्हे शाखा दोनच्या पोलीस पथकाला गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि जावई आणि सासूला अटक केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.