संजय गडदे
Mumbai Crime News: पुण्यातील दर्शना पवार हत्या प्रकरण आणि सदाशिव पेठेतील तरुणीवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता मुंबईच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंधेरी पूर्व परिसरात एका १७ वर्षीय तरुणीवर जीवघेणा चाकू हल्ला झाला आहे. (Latest Marathi News)
लग्नास नकार दिला म्हणून संतापलेल्या प्रियकराने हा चाकू हल्ला केल्याचे समोर आले आहे. सायंकाळच्या वेळेस तरुणी अंधेरी पूर्वेकडील ब्युटी पार्लर क्लासला जात असतानाच क्लास बाहेर उभे असलेल्या तिच्या २२ वर्षीय प्रियकराने तरुणीवर चाकू हल्ला करून पळ काढला. याप्रकरणी हल्लेखोर तरुणास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. उबेद शेख (२२ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्व परिसरात राहणारी सतरा वर्षीय तरुणी आणि पवईच्या चंदनशहा अली दर्गा परिसरात राहणारा बावीस वर्षीय तरुण उबेद शेख यांचे मागील अनेक दिवसांपासून प्रेम संबंध होते. त्यांचा विवाह देखील ठरला होता. मात्र मागील महिनाभरापासून या दोघांमध्ये सातत्याने भांडण होऊ लागले. आपल्या प्रियसीचे इतर मुलांसोबत प्रेम संबंध असल्याचा संशय उबेद याला आल्याने तो महिनाभरापासून आपल्या प्रेमिकेसोबत वाद घालत असे. या वादाला कंटाळून १७ वर्षीय तरुणीने आपल्या प्रियकरासोबत बोलणे बंद केले होते.
३ जुलै रोजी देखील या दोघांमध्ये वादावादी झाली याच काळात आपला प्रियकर नशा पण करत असल्याचे देखील तरुणीला समजतात तिने त्यास लग्नास नकार दिला व त्याचा फोन नंबर ब्लॉक करून पुन्हा संपर्क करू नकोस असे त्यास खडसावले. मात्र त्याच दिवशी सायंकाळी तरुणी अंधेरी पूर्वेकडील ब्युटी पार्लर क्लासेससाठी जात असताना क्लासच्या दरवाजासमोरच दबा धरून उभे असलेल्या तिच्या प्रियकराने पाठीमागून तिच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला.
या घटनेनंतर आरोपीने तेथून पळ काढला. यासंदर्भात तरुणीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात उबेद शेख विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शी यांच्याकडून माहिती मिळवून आरोपीची ओळख पटवली. आरोपी पवई येथे राहणारा असल्याचे समजतात गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी उबेद चेक याला अटक केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.