Marathi vs Hindi politics in Maharashtra : आगामी पालिका निवडणुकीच्या निमित्ताने मुंबई, ठाण्यात मराठी अस्मिता आणि हिंदीचं राजकारण जोरात आहे. शिंदे सेनेच्या मंत्र्याने तर हिंदी भाषिकांसाठी पायघड्याच घातल्यात. कोण आहेत हे मंत्री आणि मनसेने त्यांना काय प्रत्युत्तर दिलंय? पाहूया एक रिपोर्ट.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेने हिंदी भाषिक मतदारांना कुरवळण्यास सुरुवात केली आहे. मिरा भाईंदरमध्ये परीवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एका कार्यक्रमात 'हिंदी'चा नारा दिलाय. 'मी हिंदी बोलतो, तुम्हीही बोला',असं थेट आवाहन सरनाईकांनी केलंय. विशेष म्हणजे या कार्यक्रमात मूळचे आसामचे रहिवासी असलेले मिरा-भाईंदर महापालिकाचे आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी मराठीत भाषण केले. सरनाईकांच्या या वक्तव्याचा मनसेने खरपूस समाचार घेतलाय.
असं बोलण्याची सरनाईकांची ही पहिलीच वेळ नाही. ठाण्यात मी शुद्ध मराठी बोलतो. मात्र मिरा-भाईंदरमध्ये प्रवेश करताच नकळत माझ्या तोंडातून हिंदी भाषा निघते. हिंदी आपली लाडकी बहिण आहे, असं वक्तव्य केलं होतं. ठाण्यातील ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात सलग चौथ्यांदा प्रताप सरनाईक शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले आहेत. या मतदारसंघात भाईंदरचा काही भाग येतो. मतदारसंघात परप्रांतीय हिंदी भाषिकांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळेच व्होट बँकेवर डोळा ठेऊन सरनाईकांचं हिंदीवरचं ममत्व उफाळून येतं.
मिरा-भाईंदरमध्ये मराठी बोलण्याच्या मुद्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका परप्रांतीय व्यापाऱ्याला मारहाण केल्याची घटना ताजी आहे. त्यानंतर व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्च्याला प्रत्युत्तर म्हणून जुलै महिन्यात मनसेने भव्य मोर्चा काढला होता. विशेष म्हणजे या मोर्चातून प्रताप सरनाईकांना अक्षरशा हुसकावून लावलं होतं. संतप्त आंदोलनकर्त्यांसमोर त्यांना काढता पाय घ्यावा लागला होता. आता 3 महिन्यानंतर सरनाईकांनी पुन्हा हिंदी भाषेचे कौतुक केलंय. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीच्या निमित्ताने मराठी अस्मिता आणि हिंदीचं राजकारण जोरात आहे हेच यातून दिसून येतंय. यामध्ये सूज्ञ मतदारराजा काय निर्णय घेतो आणि कोणत्या पक्षाला फायदा होते ते पाहणं महत्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.