महाविकास आघाडी सरकारकडे बहुमत असून हे सरकार ५ वर्ष चालेल. मात्र, हे सरकार पाडण्यात भाजपचा छुपा हात आहे. सरकार पाडण्यासाठी आमदारांना बेशुद्ध करण्याचं इंजेक्शन दिलं जातं आहे. शिवाय ५०-५० कोटी दिल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
ज्यांना ज्यांना परत यायचं आहे त्यांच्यासाठी दरवाजे खुले आहेत. ज्यांना जायचंय त्यांच्यासाठीही दरवाजे खुले असल्याचं वक्तव्य शिनसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज कर्जत येथे केलं आहे.
मी कुठेही गेलेलो नाही, मी मुंबईतच आहे. मला कुठे जाण्याची गरज नाही. असं स्पष्टीकरण परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिले आहे. पाटील हे एकनाथ शिंदे गटात सहभागी होण्यासाठी सुरत मार्गे गुहाआटीला गेल्याच्या चर्चा सुरु होत्या.
गेली अडीच वर्षे आम्ही राज्यमंत्री फक्त नावालाच होतो, आम्हाला काहीच अधिकार नव्हते, असा खळबळजनक गौप्यस्फोट बंडखोर नेते गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात युक्तिवाद केला आहे. विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला असतानाच, आमदारकी रद्दची नोटीस कशी बजावली? असं वकील म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि इतर मंत्र्यांना मोठा दणका दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाती ही सुभाष देसाई यांच्याकडे, गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल दत्तात्रय परब यांच्याकडे, दादाजी दगडू भुसे यांच्याकडील कृषी व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदीपान आसाराम भुमरे यांच्याकडील रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे, उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.
बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिकांमध्ये संतापाची भावना आहे. शिवसैनिक आक्रमक झाले असून, त्यांनी शिर्डीत मोर्चा काढला आहे. आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जात आहेत. शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला आहे. उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील शिवसैनिक शिर्डीत एकत्र आले आहेत.
सिंधुदुर्ग येथील सावंतवाडीत शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्या घराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. सावंतवाडीत आज, शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येणार आहे. त्यामुळे केसरकर यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
डोंबिवलीत एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शिवसेना नेते संजय राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. तसेच त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिंदे गटाकडून दाखल केलेल्या याचिकेत सरकार अल्पमतात असल्याचे म्हटले आहे. शिंदे गटातील ४० आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.
परत या आजही चर्चा करायला तयार आहोत, असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना केले.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय संघर्ष सुरू आहे. शिवसेनेतील (ShivSena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड पुकारले आहे, त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. शिवसेनेने १५ आमदारांविरोधात कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. एकनाथ शिंदे गटाच्या १५ आमदारांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या संदर्भात आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. (Eknath Shinde Latest News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.