Pune News: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पुणे दौऱ्यावर आहेत. पीएम मोदींच्या या दौऱ्यानिमित्त पुण्यात (PM Modi Pune Visit) जय्यत तयारी करण्यात आली आहे. पीएम मोदींच्या या दौऱ्यानिमित्त पुण्यात अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी वाहतूक मार्गात बदल देखील करण्यात आले आहेत. त्याचसोबत शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे.
याच मुद्द्यावरुन आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Thackeray Group Leader Sushma Andhare) यांनी पीएम मोदींच्या या दौऱ्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट करत पीएम मोदींवर टीका केली आहे.
सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, 'पुण्यातल्या रस्त्यांवर कर्फ्यू सदृश्य परिस्थिती आहे. अनेक शाळांना सुट्ट्या सुद्धा दिल्या आहेत. एका भित्र्या माणसाच्या पुरस्कार समारंभासाठी अख्खं शहर वेठीला धरणे ही लोकशाही की हुकूमशाही?' अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी मोदींच्या दौऱ्यावर टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याला इंडिया फ्रंट पुणेकडून विरोध करण्यात आला आहे. मोदींच्या या दौऱ्याला विरोध करण्यासाठी अनेक राजकीय पक्ष एकवटले आहेत. मोदींविरोधातील राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची एकत्र पत्रकार परिषद घेतली होती.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, जनता दल समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पक्ष मोदींच्या दौऱ्याविरोधात आंदोलन करणार आहेत. काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार असून यामध्ये एकूण २६ पक्ष आणि संघटना सहभागी असणार आहेत. पुणेकरांनी काळे कपडे घालून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यासमोर आज आंदोलन करण्यात येणार आहे.
मोदी विरोधक आंदोलनासाठी एकत्र यायला सुरुवात झाली आहे. आंदोलनाच्या ठिकाणी बाबा आढाव, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे उपस्थित आहेत. या सर्व आंदोलकांनी काळे कपडे घातले आहेत. पीएम मोदींविरोधात घोषणाबाजी सुरु आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.