प्रसिद्ध यूट्युबर आणि बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादवच्या अडचणी वाढल्या आहे. नोएडा पोलिसांनी गंभीर आरोपांखाली त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. एल्विश रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याच्या प्रकरणात अडकला आहे. एल्विशने हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. एल्विशमुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. विरोधी पक्ष थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीकास्त्र सोडत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक फोटो शेअर करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. वडेट्टीवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर एल्विश यादवसारख्या विषारी नशाबाजांचा सुळसुळाट... शाल नारळ देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आदरतिथ्य!
गणपती पूजननिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या एल्विश यादवला शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बोलावून आदरतिथ्य केले होते, त्याला सापाच्या विषापासून ड्रग्स बनवणे, सेवन करणे आणि विकणे यासारख्या गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
महिलांबाबत अपशब्द वापरणारा, विषारी ड्रग्स चे सेवन विक्री करणाऱ्या आरोपीचे आदरतिथ्य करून मुख्यमंत्री एल्विश यादवसारख्या नशाबाज तरुणांना राज्यातील तरुणांचे रोल मॉडेल बनवण्यात हातभार लावत आहे का? आधीच राज्यात ड्रग कारखाने सापडत आहेत, ललित पाटील शासकीय पाहुणचार झोडतो, मग पळवून लावला जातो आणि इथे वर्षावर नशाबाज आरती करतो हे आहे महायुती सरकार, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्वीट करत म्हटलं की, हा एल्विश यादव... याच्यावर ड्रग्सशी संबंधित अनेक गुन्हे दाखल आहेत. विषारी सापांपासून ड्रग्स बनवून ते रेव्ह पार्ट्यांना पुरवण्याचे आरोप एल्विशवर आहेत. राज्यामध्ये ठीकठिकाणी ड्रग्सचे साठे, कारखाने आढळत आहेत. त्यात आमचा काही सहभागच नाही किंवा आमचा संबंधच नाही. अशा मखलाशा सरकारकडून रोज केल्या जात आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की हा एल्विश यादव मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर आरतीसाठी कसा बरं पोहोचला असेल? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी देखील ट्वीट करत मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान गुन्हेगारांसाठी पर्यटनस्थळ झाले आहे का? एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात विषारी सापांच्या विषाच्या रेव्ह पार्ट्या आयोजित करणाऱ्या एल्विश यादव सारख्या टुकार यूट्युबरला विशेष आमंत्रण देऊन गणपती आरतीला बोलावले होते.
आता नोएडा पोलिसांनी विषारी रेव्ह पार्टी आयोजित केल्याप्रकरणी एल्विश यादव व त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा नोंद केला असून त्यांच्याकडे जिवंत विषारी साप सापडले आहेत. यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पुण्यातील कुख्यात गुंड बाबा बोडकेंचे वर्षा बंगल्यावरील फोटो आले होते. अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? असा टोला अतुल लोंढे यांनी लगावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.