Pune Crime News: गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गुन्हेगारांना कायदा आणि पोलिसांचा धाक नसल्याचं दिसून येत आहे. एकीकडे दर्शना पवार या तरुणीच्या हत्येची घटना ताजी असताना दुसरीकडे मंगळवारी सकाळी पुण्यात एक भयानक घटना घडली. एका महाविद्यालयीन तरुणीवर भररस्त्यात तिच्या मित्राने कोयत्याने वार केले. या घटनेत तरुणी जखमी झाली. स्थानिकांनी वेळीच तरुणाच्या हातातून कोयता हिसकावल्याने मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, या घटनेवर राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे की, पुणे शहर व परिसरातील कोयता घेऊन हल्ले करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळा. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे त्याला गुन्हेगारांचे नंदनवन बनवू नका, असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
त्याचबरोबर पुणे शहरात भररस्त्यात तरुणीच्या मागे कोयता घेऊन धावणाऱ्या तरुणाला अडवून त्या मुलीचे दोन धाडशी तरुणांनी प्रसंगावधान राखून प्राण वाचवले. या तरुणांनी दाखविलेले धाडस अतिशय कौतुकास्पद आहे. मुलीवर प्राणघातक (Crime News) हल्ला होत असताना आपल्या प्राणाची पर्वा केली नाहीत्यांचे याबद्दल हार्दिक अभिनंदन, असंही सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि तिचा मित्र दुचाकीवरून कॉलेजला निघाले होते. पुण्यातील (Pune News) सदाशिव पेठ परिसरात ते आले असता, अचानक शंतनू लक्ष्मण जाधव (वय २२, रा. मुळशी) हा त्यांच्या दुचाकीला आडवा झाला. काही कळण्याच्या आत शंतनू याने बॅगेतून कोयता काढत दुचाकीवर असणाऱ्या तरुण-तरुणीवर वार करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी दुचाकीवरील तरुण आपला जीव वाचवत तिथून पळून गेला. त्यानंतर शंतनू जाधव याने तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. दरम्यान, परिसरातील स्थानिकांनी वेळीच धाव घेत आरोपी शंतनू जाधव याच्या हातून कोयता हिसकावून घेत तरुणीचा जीव वाचवला.
स्थानिकांनी आरोपी शंतनूला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं. या घटनेत दोघेही तरुण तसेच तरुणी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.