Mumbai -Pune Expressway Latest Update : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. महामार्गावरून प्रवास करताना वाहतूक नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई तर होतेच, पण आता त्याची अंमलबजावणी अत्यंत कठोरपणे होणार आहे.
मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावरून (Mumbai-Pune Expressway) दररोज लाखो वाहने जात असतात.चालक बेदरकारपणे वाहने हाकतात. 'अतिघाई, संकटात नेई', वाहने सावकाश हाका, असं आवाहन ठिकठिकाणी करण्यात येते. पण त्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे. वाहनचालक कानाडोळा करून वाहने सुसाट नेतात. वाहनांचा अतिवेग आणि बेदरकारपणे ड्रायव्हिंग करणे ही खूप मोठी समस्या आहे. कारण यामुळे अपघातांच्या घटनांना आपसुकच निमंत्रण मिळते.
आता रस्ते विकास प्राधिकरणानं यावर जालीम तोडगा काढला आहे. साधारण ९४ किलोमीटर महामार्गावर इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम अर्थात ITMS बसवण्यात येणार आहे.
महामार्गावर हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.अगदी नियोजनबद्ध पद्धतीने सर्वात धोकादायक ठिकाणी हे कॅमेरे बसवण्यात येणार असून, वाहतुकीवर करडी नजर ठेवून असणार आहेत. साधारण १०६ हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत.
या हायटेक कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर करडी नजर असेल. विशेषतः अतिवेगाने वाहन चालवणे,मार्गिकेचे नियम न पाळणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करण्यासारखे प्रकार या कॅमेऱ्यांमध्ये लगेच टिपण्यात येतील. त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई झाल्यास वाहतुकीला शिस्त आणि अपघातांचे प्रमाण घटण्यास मदत होऊ शकते.
मुंबई-पुणे महामार्गावर काही संशयास्पद घटना वाटल्यास त्याबाबतचा अलर्ट तात्काळ नियंत्रण कक्षाला देण्यात येईल.त्यानंतर संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या किंवा नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर पाचशे ते दोन हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
गेल्या काही वर्षांत या महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. संबंधित यंत्रणांनी अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. वाहतूक विभाग आणि संबंधित रस्ते विकास प्राधिकरणाकडून वेळोवेळी पावले उचलण्यात येत आहेत. मात्र, तरीही अपघातांच्या घटना अपेक्षितरित्या कमी झालेल्या नाहीत. आता रस्ते विकास प्राधिकरणाने उचललेले हे पाऊल या घटनांना रोखण्यास मदत करून महामार्ग वाहतुकीसाठी अधिक सुरक्षित होण्यास मदतगार ठरेल, अशी अपेक्षा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.