mumbai police prohibits mumbai march of samyukt kisan morcha saam tv
मुंबई/पुणे

Samyukt Kisan Morcha: मुंबई मोर्चाला परवानगी नाकारली, पाेलीसांच्या विराेधात शेतकरी कामगार ठाेठावणार उच्च न्यायालयाचे दरवाजे

Siddharth Latkar

- सचिन बनसाेडे

Nagar News :

शेतकरी कामगारांनी मुंबई मोर्चासाठीची मुंबई पोलीसांनी परवानगी नाकारल्यानंतर न्यायालयाचे दरवाजे ठाेठावण्याचा निर्णय घेतला आहे. या माेर्चास परवानगी नाकारण्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चा (samyukt kisan morcha) व कामगार कर्मचारी (kamgar karmachari) संयुक्त कृती समितीने स्पष्ट केले आहे. दरम्यान श्रमिकांच्या मागण्यांसाठी राज्यभर रणांगणात उतरणार असल्याचे संयाेजकांनी स्पष्ट केले आहे. (Maharashtra News)

शेतकरी, कामगार व श्रमिक वर्गाचे देशभर तीव्र होत असलेले प्रश्न केंद्रस्थानी आणण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा व केंद्रीय कामगार कर्मचारी संघटनांच्या वतीने २४ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय मेळाव्यात देशभर २६ नोव्हेंबर २०२३ पासून देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती.

देशभरातील सर्व राज्यांमध्ये राजधानीच्या शहरांत २६,२७ व २८ नोव्हेंबर असे तीन दिवस कामगार व शेतकऱ्यांनी लाखोंच्या संख्येने एकत्र येत महामुक्काम सत्याग्रह करून श्रमिकांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधावे असे आवाहन या राष्ट्रीय मेळाव्यात करण्यात आले होते.

महाराष्ट्रात यानुसार संयुक्त किसान मोर्चात सहभागी प्रमुख १३ शेतकरी संघटना व कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या ११ कामगार कर्मचारी संघटनांनी जोरदार तयारी करून एक लाख शेतकरी कामगारांचा मोर्चा मुंबई येथे संघटित करण्याचा निर्णय पुणे येथे १५ ऑक्टोबर रोजी झालेल्या संयुक्त बैठकीत घेतला होता.

मुंबईतील शिवाजी पार्क येथे राज्यभरातील एक लाखापेक्षा अधिक शेतकरी कामगार दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्रीपर्यंत जमणार होते. रात्री तेथेच मुक्काम करून सकाळी ९ वाजता हे लाखो श्रमिक आपल्या मागण्यांसाठी मुंबई मंत्रालयाकडे कूच करतील असे नियोजन करण्यात आले होते. गेला महिनाभर जिल्हावार मेळावे घेऊन या कृतीची तयारी सर्व सहभागी संघटनांनी केली होती.

मात्र शेतकरी कामगारांचे मूलभूत प्रश्न केंद्रस्थानी आणण्यासाठी काढण्यात येत असलेल्या या मोर्चाची परवानगी मुंबई पोलिसांनी नाकारली असून मुंबईत असा कोणताही मोर्चा काढण्यास पोलीस प्रशासनाने मज्जाव केला आहे.

राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती आ वासून उभी आहे. कामगार कर्मचाऱ्यांचे प्रश्न तीव्र झाले आहेत. महागाई व बेरोजगारी भयावह प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत जातीधर्माच्या मोर्चा-मेळाव्यांना परवानग्या दिल्या जात असताना श्रमिकांच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या मोर्चास मात्र परवानगी नाकारण्यात येत आहे.

राज्य सरकार व पोलीस प्रशासनाची ही अत्यंत लोकशाही विरोधी कृती आहे. संयुक्त किसान मोर्चा व कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीत सहभागी असलेल्या सर्व संघटना पोलिसांच्या या लोकशाही विरोधी कृतीचा तीव्र शब्दात धिक्कार करत असून या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकार व पोलिसांच्या विरोधात दाद मागणार असल्याचे जाहीर केले आहे.

मुंबई मोर्चाची जबरदस्त तयारी पूर्ण झालेली असताना परवानगी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चा व कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीची १९ नोव्हेंबर रोजी ऑनलाईन राज्यव्यापी बैठक घेण्यात आली. बैठकीत बदललेल्या परिस्थितीनुसार दिनांक २६ ,२७ व २८ नोव्हेंबर रोजी सर्व राज्यभर सर्व जिल्हाधिकारी कार्यालये व तहसील कार्यालयांवर शेतकरी शेतमजूर कामगार कर्मचाऱ्यांच्या मागण्या केंद्रस्थानी आणण्यासाठी हजारो श्रमिकांचा सहभाग असलेले तीन दिवसीय मुक्काम सत्याग्रह, निदर्शने, मोर्चे आयोजित करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मुंबईत आझाद मैदान येथे मुंबईतील हजारो कामगार, कर्मचारी व श्रमिक जनता मुक्काम ठोकून या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

राज्यात दुष्काळ, जमीन, जमीन अधिग्रहण, पुनर्वसन, दूध व शेतीमालाचे भाव, पाणी वाटप, रेशन, महागाई, बेरोजगारी, शिक्षण, कंत्राटीकरण, किमान वेतन, कामगार कपात, आरोग्य, पर्यावरण यासारखे प्रश्न गंभीर झाले आहेत.

राज्यातील जनतेने या पार्श्वभूमीवर श्रमिकांच्या या मूलभूत प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरत या आंदोलनांमध्ये प्रचंड संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयुक्त किसान मोर्चा व कामगार कर्मचारी संयुक्त कृती समिती करत आहे.

केंद्र व राज्य सरकारने जाती व धर्माच्या बाबत जनतेला आपसात झुलवीत जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे थांबवावे व श्रमिकांचे ज्वलंत प्रश्न तातडीने सोडवावेत असा इशारा संयुक्त किसान मोर्चा व कामगार कर्मचारी संयुक्त कृती समिती केंद्र व राज्य सरकारला देत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आंदोलनाच्या मागण्या

१) संपूर्ण राज्यात दुष्काळ जाहीर करा. शेतकरी-शेतमजुरांची संपूर्ण कर्जमाफी करा. पीक विमा कंपन्यांना संपूर्ण पीक नुकसानभरपाई देण्यास बंधनकारक करा.

२) महागाई वर नियंत्रण आणा. औषधे, अन्नपदार्थ, कृषी साधने व मशिनरी अशा आवश्यक वस्तूंवरील जीएसटी रद्द करा. पेट्रोल, डिझेल व गॅस वरील उत्पादन शुल्क कमी करा. सार्वजनिक रेशन व्यवस्था मजबूत करा.

३) कॉर्पोरेटधार्जिण्या व कामगारविरोधी चार श्रमसंहिता रद्द करा. सर्व कामगार कायदे पुनः स्थापित करा.

४) सर्वांना किमान वेतन २६ हजार रुपये दरमहा करा.

५) शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव द्या आणि त्या भावात खरेदीची व्यवस्था करा.

६) वनाधिकार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा. देवस्थान, इनाम आदि जमिनी कसणाऱ्यांच्या नावावर करा.

७) सर्वांना मोफत शिक्षण, आरोग्य सुविधा, पाणी पुरवण्याची हमी द्या. नवे शैक्षणिक धोरण रद्द करा. सर्वांसाठी घरांची व्यवस्था करा.

८) सर्व सरकारी व निमसरकारी रिक्त पदे ताबडतोब भरा. मनरेगाचा विस्तार करून कामाचे दिवस व वेतन किमान दुप्पट करा.

९) खाजगीकरण थांबवा. सार्वजनिक क्षेत्राला बळकट करा.

१०) सर्वांना किमान दहा हजार रुपये पेन्शन द्या.

११) कायमस्वरूपी कामावरील कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करा. अंगणवाडी, आशा आदी योजना कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा द्या.

१२) सध्याची पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा.

१३) वीज दुरुस्ती विधेयक व स्मार्ट मीटर प्रकल्प रद्द करा.

१४) अति श्रीमंतांवर ज्यादा कर लागू करा. कॉर्पोरेट टॅक्स मध्ये वाढ करा. संपत्ती कर व वारसा हक्क कर पुन्हा लागू करा.

१५) राज्य घटनेवरील हल्ले, द्वेषाचे धर्मांध राजकारण आणि सध्या सुरू असलेली अघोषित आणीबाणी ताबडतोब थांबवा.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT