मुंबई: राणी बागेतल्या पेंग्विनमुळं सध्या मुंबईत राजकिय वातावरण तापलं आहे. पेंग्वीनवर होणारा अतिरीक्त खर्च, कोट्याधींचं टेंडर यावर विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर आज महापौर किशोरी पेडणेकरांनी थेट पेंग्विन कक्षातच पत्रकार परिषद घेत मुंबईकरांना २ नवजात पेंग्विनबाबत गोड बातमी दिली आहे. मात्र, राणीबागेतल्या पेंग्विनकडच्या या गोड बातमीनंतर पुन्हा एकदा मुंबईत राजकिय वार-पलटवारांना सुरुवात झाली आहे.
स्पेशल एसी रुम, विहार करायला निळाशार पाणी, खायला स्पेशल सी फुड, देखरेखीला डॉक्टर्स - तज्ञांची फौज आणि रोजची बडदास्त. हे सगळं काही राणी बागेतल्या या पेंग्विनसाठी आहे. या ७ पेंग्विनच्या सुश्रुषा आणि सगळ्या गोष्टींसाठी लाखो नव्हे, तर करोडो रुपये खर्च केले जात आहेत. आणि आता यात आणखी दोन छोट्या नवजात शिशु पेंग्विनची भर पडली आहे.
कोरोनामुळे जवळपास दोन वर्षांपासून राणीबाग पर्यटकांसाठी बंद आहे. त्यामुळे राणीबागेचं उत्पन्नही ठप्प झालं आहे. मात्र, कोरोनाकाळातही महापालिका प्रशासनानं या पेंग्वीनची विशेष काळजी घेतली आहे. आणि याच काळात राणी बागेतल्या पेंग्वीन कक्षात एक नव्हे तर दोन-दोन पाळणे हललेत. पण एकीकडे कोरोनाचं थैमान सुरु असतांना मुंबईकर मृत्युशय्येवर होते आणि सत्ताधारी पेंग्विनचे पाळणे झुलवत होते अशी टीका आता विरोधकांकडून होत आहे.
पेंग्विनच्या देखभालीसाठी पुढच्या तीन वर्षांकरता १५ कोटींचं टेंडर महापालिका काढणार आहे . या टेंडरनुसार एका दिवसाचा एका पेंग्विनचा खर्च हा जवळपास २० हजारांपर्यंत केला जातोय. २० हजार हा सर्वसामान्य मुंबईकरांची एका महिन्याची कमाई असते. पण, आधीच कोरोना, लॉकडाऊन आणि आटलेल्या उत्पन्न स्त्रोतांमुळे पालिकेच्या तिजोरीला गळती लागलेली असतांना पेंग्विनच्या व्हिआयपी लाईफस्टाईलवर एवढा खर्च कश्यासाठी हा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.
कशी आहे पेंग्विनची लक्झरिअस लाईफस्टाईल
- एका दिवसाचा एका पेंग्विनवरती खर्च--२० हजार
- एका दिवसाचा संपूर्ण ७ पेंग्विनवरचा खर्च-- दिड लाख
- एका महिन्याचा एका पेंग्विनसाठी खर्च-६ लाख
- एका महिन्याचा ७ पेंग्विनचा खर्च-- 42 लाख
- एका वर्षाचा एका पेंग्विनसाठीचा खर्च--71लाख
- एका वर्षाचा ७ पेंग्विनवरचा खर्च--5 कोटी
- एकूण ३ वर्षांसाठी ७ पेंग्विनचा खर्च--१५ कोटी
- पेंग्विन खरेदीसाठी आणि कक्षासाठी एकूण २५ कोटींचा पालिकेने खर्च केला होता. त्यानंतर ३ वर्षाच्या देखभालीसाठी ११ कोटी खर्च झाले आहेत. त्यानंतर आता पुन्हा पुढच्या तीन वर्षांसाठी १५ कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे.
- निवीदा काढलेली रक्कम पेंग्विन प्रदर्शनाची देखभाल आणि वातानुकुलन सुविधा, लाइफ सपोर्ट आणि इलेक्ट्रिकल सिस्टीम, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा आणि पेंग्विनसाठी मासे, अन्न पुरवण्यासाठी खर्च केली जाणार आहे.
- २०१७ साली दक्षिण कोरियातून आलेल्या हम्बोल्ट पेंग्विनसाठी विशेष वातानाकुलित कक्ष उभारण्यात आला आहे .
- पेंग्विनच्या दररोजच्या देखभालीसाठी विशेष पशुवैद्किय अधिकारी आणि डॉक्टर्स नेमलेले आहेत.
- दररोज पेंग्विनसाठी विशेष खाद्य,विशेष प्रकारचे मासे आणि इतर सप्लीमेंटस् दिल्या जातात
अर्थात पेंग्विनसाठी काढलेले हे टेंडर पुन्हा फेरबदल करुन काढले जाईल आणि पेंग्विनसंबंधीत जास्तीत जास्त सुविधांची तजवीज महापालिकेकडूनच करुन खर्च कमी केला जाईल असं महापालिका आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं . मात्र, आज टेंडरमध्ये कोणताच बदल होणार नाही असं महापौरांनी घोषित केलंय. त्यामुळे पेंग्विनच्या टेंडरबाबत प्रशासन आणि सत्ताधारी यांच्यात ताळमेळच नाही हे स्पष्ट झालंय.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.