मेट्रो लाईन ५चा विस्तार होऊन मार्गिका ३४.२१ किमीपर्यंत वाढणार
ठाणे ते धामणकर नाका फेज-१ची CMRS तपासणी लवकरच
मेट्रो 5एमुळे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगरला मोठा फायदा
प्रवासाचा वेळ ४० ते ५० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता
‘मुंबई इन मिनिट्स’ संकल्पनेला या प्रकल्पामुळे गती मिळणार
मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणाऱ्या मेट्रो लाईन ५ प्रकल्पाने आता महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. मेट्रो लाईन 5च्या विस्तारित टप्प्याला नुकतीच मंजुरी मिळाली. त्यानंतर या मार्गिकेची एकूण लांबी ३४.२१ किलोमीटरपर्यंत वाढणार असून ती MMR मधील सर्वात मोठ्या मेट्रो मार्गिकांपैकी एक ठरणार आहे. त्याचबरोबर या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची CMRS तपासणी लवकरच होणार असल्याने प्रवाशांमध्ये उत्सुकता वाढली आहे. या प्रक्रल्पामुळे 'मुंबई इन मिनिट्स' (Mumbai In Minute) संकल्पनेला मोठी गती मिळणार असून ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मेट्रो लाईन ५चा विस्तार ‘मेट्रो 5ए’च्या माध्यमातून केला जाणार आहे. यापूर्वी या मार्गिकेची लांबी २२.३८ किलोमीटर होती. आता ११.८३ किलोमीटरच्या नव्या विस्तारामुळे ही लांबी ३४.२१ किलोमीटरपर्यंत पोचणार आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा ठाणे ते धामणकर नाका दरम्यान असणार आहे. ११.९ किलोमीटर लांबीच्या या मार्गावर बाळकुम, कशेळी, काल्हेर, पूर्णा, अंजूरफाटा आणि धामणकर नाका अशी सहा स्थानके असतील. या टप्प्यासाठी सुमारे ६,७४१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
दुसऱ्या टप्प्यात धामणकर नाका ते दुर्गाडी हा १०.४८ किलोमीटरचा मार्ग विकसित केला जाणार आहे. या टप्प्यातील काही स्थानके उन्नत तर भिवंडीतील स्थानक भूमिगत असणार आहे. यासाठी ७,३२६ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात मेट्रो ५एचा विकास करण्यात येणार असून दुर्गाडी, खडकपाडा, भोईरवाडी, शांतिनगर आणि उल्हासनगरपर्यंत विस्तार होणार आहे. या मार्गावर सात स्थानके आहेत.
मेट्रो लाईन५ ही विठ्ठलवाडी (Vitthalwadi) आणि उल्हासनगर (Ulhasnagar) रेल्वे स्थानकांशी थेट जोडणार असून फीडर बस सुविधेमुळे लास्ट माइल कनेक्टिव्हिटीही सुधारेल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा वेळ ४० ते ५० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. MMRDAचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले की, “मेट्रो लाईन ५ फेज-१चे काम प्रगत टप्प्यात असून CMRS तपासणीची तयारी सुरू आहे. ही मार्गिका सुरू झाल्यानंतर ‘मुंबई इन मिनिट्स’ संकल्पनेला मोठी गती मिळेल.”
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.