जोगेश्वरी पश्चिमेतील मालिका रुग्णालयाच्या टेरेसवर अग्नितांडव
गॅस गळतीनंतर सिलिंडर पेटल्याने आगीचा भडका उडाला
या दुर्घटनेत दोन रुग्णालय कर्मचारी गंभीररीत्या भाजले
जखमींवर उपचार सुरु
मुंबईतील जोगेश्वरी पश्चिमेकडील मालिका रुग्णालयाच्या टेरेस फ्लोअरवर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास गॅस गळतीनंतर अचानक आग लागल्याची घटना घडली. रात्री सुमारे २.१५ वाजता घडलेल्या या प्रकारामुळे रुग्णालय परिसरात काही काळ मोठी खळबळ उडाली. या दुर्घटनेत रुग्णालयातील दोन कर्मचारी गंभीररीत्या भाजले असून, त्यांच्यावर सध्या दुसऱ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, टेरेसवर गॅस सिलिंडर ठेवण्यात आला होता. गॅस गळती झाल्यानंतर सिलिंडर पेटल्याने आगीचा भडका उडाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, आग नेमकी कशामुळे लागली आणि त्यानंतर सिलिंडरचा स्फोट कशामुळे झाला, याचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी रुग्णालयातील काही कर्मचारी टेरेसवर गप्पा मारत बसले होते. त्यापैकी एका कर्मचाऱ्याला सर्वांसाठी चहा बनवायला सांगितले. चहा करण्यासाठी गॅस पेटवण्याचा प्रयत्न करताच अचानक मोठा आगीचा भडका उडाला. या आगीत तेथे उपस्थित असलेले दोन कर्मचारी गंभीररीत्या भाजले.
घटनेनंतर दोन्ही जखमी कर्मचाऱ्यांना सुरुवातीला मालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, भाजण्याचे प्रमाण गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी अन्य रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांचे जबाबही नोंदवले आहेत. मात्र, नातेवाईकांकडून रुग्णालय प्रशासनाविरोधात कोणतीही तक्रार करण्यात आलेली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
या घटनेनंतर रुग्णालयातील गॅस सिलिंडरची सुरक्षितता, गॅस गळती रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना आणि अग्निसुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. रुग्णालय प्रशासनाच्या पातळीवर सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का, याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. तपासात निष्काळजीपणा किंवा सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास पुढील कायदेशीर कारवाई होऊ शकते. या घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य विभाग आणि अग्निशमन दलाकडूनही रुग्णालयातील अग्निसुरक्षा आणि गॅस व्यवस्थेची तपासणी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. आगीत झालेल्या नुकसानीचे प्रमाण तसेच गॅस गळतीमागील वास्तविक कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.