संजय गडदे, साम टीव्ही
नागरिकांना सुरक्षित आणि भेसळमुक्त दूध मिळावे, यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने मुंबईतील गोवंडी, मानखुर्द, अँटॉप हिल, चेंबूर आणि धारावी परिसरात २३ व २४ ऑक्टोबर रोजी विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत विविध दूध विक्री केंद्रांमधील नियमांचे उल्लंघन उघडकीस आले. कारवाईदरम्यान एकूण ५६४ लिटर दूध नष्ट करण्यात आले असून, संबंधित आस्थापनांविरुद्ध परवाना किंवा नोंदणी निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
गोवंडी आणि मानखुर्द परिसरात केलेल्या तपासणीत गोवंडी येथील साईनाथ डेअरी अँड फरसाण मार्टमधून ४५ लिटर, तर मानखुर्द येथील महाराणा डेअरीमधून ४० लिटर संशयास्पद सुटे दूध जप्त करून नष्ट करण्यात आले. या दुधाचे नमुने प्रयोगशाळेतील विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. या दोन्ही आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षा नियमांतील ‘शेड्युल ४’च्या तरतुदींचे उल्लंघन आढळल्याने त्यांची नोंदणी निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मानखुर्द येथील अगस्ती मिल्क एजन्सीमध्ये स्वच्छता आणि आरोग्यविषयक मानकांचे पालन होत नसल्याचे आढळले. त्यामुळे या आस्थापनेचा परवाना निलंबित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. गोवंडी पूर्व येथील यादव डेअरी विनापरवाना सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. अँटॉप हिलमधील कोकरी आगार परिसरातील मे. सागर मिल्क सेंटर येथे २४ ऑक्टोबर रोजी तपासणी करण्यात आली. यावेळी पाश्चराइज्ड होमोजिनाइज्ड टोन्ड दुधाचा नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आला. दुधाची साठवणूक आणि विक्री प्लास्टिकच्या पिशव्या व कॅन्समधून केली जात असल्याचे, तसेच पुरवठा साखळीतील साठवणुकीच्या अटींचे पालन होत नसल्याचे आढळले. याप्रकरणी आयुक्तांच्या ३ जुलै २०२६ रोजीच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याने २५० लिटर दूध नष्ट करण्यात आले. या दुधाची किंमत ११ हजार ६२५ रुपये असून, पंच आणि संबंधित अन्न व्यावसायिकाच्या उपस्थितीत दुधाची विल्हेवाट लावून पंचनामा करण्यात आला.
२३ ऑक्टोबर रोजी चेंबूर आणि धारावी परिसरातही तपासणी करण्यात आली. धारावी येथील मे. शक्ती डेअरीमधून ३१ लिटर सुटे गायीचे दूध, तर माहीम पश्चिम येथील मे. राहुल मिल्क सेंटरमधून १९८ लिटर कच्चे सुटे गायीचे दूध जप्त करून नष्ट करण्यात आले. या दोन्ही आस्थापनांमधून एकूण २२९ लिटर दूध नष्ट करण्यात आले असून, संबंधितांविरुद्ध परवाना निलंबनाची कारवाई सुरू आहे. तसेच चेंबूर पूर्व येथील मे. सिद्धेश्वर मिल्क एजन्सीमध्ये पाश्चराइज्ड होमोजिनाइज्ड टोन्ड दुधाची तपासणी करण्यात आली. धारावीतील मे. बनारसी डेअरी फार्म येथे सुट्या आणि पॅकबंद गायीच्या दुधाची तपासणी करण्यात आली.
दुधाची गुणवत्ता, साठवणुकीची पद्धत, स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि भेसळमुक्त दूध उपलब्ध व्हावे, यासाठी अशा विशेष तपासणी मोहिमा यापुढेही सुरू राहणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दूध विक्री केंद्रांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.