CSMT स्थानकातील RPF कोठडीत धक्कादायक घटना
RPF कोठडीत मध्य प्रदेशातील तरुणाचा मृत्यू
वॉशरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळला मृतदेह
RPF जवानांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच CSMT स्थानकातील RPF च्या कोठडीत धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले. RPFच्या ताब्यात असलेल्या एका इसमाचा मृत्यू झाला आहे. या तरुणाचा मृतदेह शौचालयात सापडल्याने एकच खळबळ उडाली. या मृत तरुणाचे नाव इमरान शेख असे असल्याची माहिती आहे. इमरानच्या कुटुंबियांच्या आरोपानुसार, RPF कर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस अधिकचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, इमरान हा मूळचा मध्य प्रदेश येथील खंडवा गावातील रहिवासी आहे.त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. तो रोजगाराच्या शोधात मध्य प्रदेशातून मुंबईत आला होता. २० सप्टेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास इमरान खंडव्याला जाणाऱ्या गाड्यांची माहिती घेण्यासाठी मुख्य चौकशी कक्षाकडे गेला. यादरम्यान RPF च्या जवानांना इमरानने त्याला कोणीतरी त्याच्यावर हल्ला करू पाहत असल्याचं सांगितलं. तसेच त्याची वर्तणूक अस्वस्थ असल्याचे RPF अधिकाऱ्यांनी सांगितले. काही वेळाने त्याने आक्रमक होत RPF चे SI अनिकेत यांच्यावर हात उगारला तसेच स्वतःलाही मारहाण केली, असा अधिकाऱ्यांचा दावा आहे.
स्वतःला इजा होऊ नये म्हणून RPF कर्मचाऱ्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि GRPला माहिती दिली. त्यानंतर GRP CSMTचे पाच कर्मचारी RPF पोस्टवर दाखल झाले. इमरानला जखमी अवस्थेत RPF ने ताब्यात घेतले. दरम्यान, दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास इमरानला वॉशरूमला जाण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, ७ ते ८ मिनिटे उलटूनही तो बाहेर न आल्याने RPF कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडला. त्यावेळी तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आले. दुपारी सुमारे १२ वाजता रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
इमरानच्या कुटुंबीयांनी त्याचा मृत्यू RPF कर्मचाऱ्यांच्या मारहाणीत झाल्याचा आरोप केला आहे. मात्र, रेल्वे अधिकाऱ्यांनी हा आरोप फेटाळत इमरानने प्रथम RPF कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. या परस्परविरोधी दाव्यांमुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. CCTV फुटेजच्या तपासात इमरान सकाळपासून CSMT परिसरात फिरत असल्याचे दिसून आले आहे. त्याने GRP कार्यालय आणि हेल्प डेस्कलाही भेट दिली होती. त्याच्याकडे ओळखपत्र किंवा मोबाईल फोन आढळला नाही. मात्र, खंडवा-भुसावळ आणि नाशिक-दादर अशी दोन जनरल तिकिटे मिळाली आहेत.
GRPने सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी JJ रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, स्टेशन आणि RPF कार्यालयातील CCTV फुटेज सुरक्षित करण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी आता महाराष्ट्र CIDकडे सोपवण्यात आली असून, CID कोकण परिक्षेत्राचे SP प्रशांत वाघुंडे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.