संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी
Mumbai fake income tax officers extortion case : 'स्पेशल २६’ या हिंदी चित्रपटाच्या धर्तीवर आयकर विभाग व क्राईम ब्रँचचे अधिकारी असल्याचे भासवून एका व्यापाऱ्याच्या कार्यालयात बेकायदेशीरपणे प्रवेश करत १ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा अंधेरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार राजकुमार कंडासामी (४९) यांच्या कार्यालयात सहा पुरुष आणि तीन महिलांनी संगनमत करून प्रवेश केला. आपण आयकर विभाग तसेच क्राईम ब्रँचचे सरकारी अधिकारी व कर्मचारी असल्याचे त्यांनी भासवले. आरोपींनी बनावट सरकारी ओळखपत्रे दाखवून तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीचे अपहरण केल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.
कार्यालयात प्रवेश केल्यानंतर आरोपींनी तक्रारदार, त्यांच्या पत्नी आणि तिथे उपस्थित असलेल्या इतर १० कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन काढून घेतले. यानंतर सर्वांना कार्यालयाबाहेर जाण्यापासून रोखण्यात आले. कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देत आरोपींनी शिवीगाळ केली आणि कारवाई टाळण्यासाठी १ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली.
या प्रकारानंतर तक्रारदाराने तातडीने अंधेरी पोलिस ठाण्यात नऊ अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अंधेरी पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपींचा शोध घेत संतोष उदय खोपटकर (३७), विनय रमेश मोरे (३७), प्रेम किशन सबनानी (५०), प्रज्ञा हरीश माईन (२७), रेश्मा श्यामराव वारंग (४१) आणि सबीना हाफिज शेख (४८) या सहा जणांना अटक केली आहे.
ही यशस्वी कारवाई परिमंडळ १० चे पोलिस उपआयुक्त (DCP) दत्ता नलावडे आणि अंधेरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश मच्छिंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास कदम, पोलिस उपनिरीक्षक रोहन सुवे, रमेश कर्पे आणि त्यांच्या संपूर्ण तपास पथकाने केली.
या टोळीत आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का, त्यांनी बनावट सरकारी ओळखपत्रे कुठून आणली, तसेच अशाच प्रकारे त्यांनी इतर कोणाची फसवणूक केली आहे का, या दिशेने अंधेरी पोलिस सध्या पुढील तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.