मुंबईत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न
अंधेरीत बिल्डरला धमकी देऊन खंडणी मागितल्याचा आरोप
पैसे घेताना तिघांना रंगेहात अटक करण्यात आली
बीएमसीमध्ये तक्रार करण्याची धमकी देऊन पैसे मागितले
मुंबई महानगरपालिकेत आणि पोलिस ठाण्यात बांधकामाविरोधात तक्रार करण्याची धमकी देऊन बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी उकळण्यात आल्याची घटना अंधेरीत घडली. या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. संजय धोडमणी, प्रवीण सिंग आणि जीवन गुलाब पांडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे आरोपी अंधेरी-जोगेश्वरी परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्वेतील ओल्ड नागरदास रोड परिसरात एका बांधकाम व्यावसायिकाचे बांधकाम सुरू होते. या बांधकामाविरोधात मुंबई महानगरपालिकेत तक्रार करून तोडक कारवाई घडवून आणण्याची धमकी आरोपींनी दिल्याचा आरोप आहे. ही कारवाई थांबवायची असेल, तर ३ लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी करण्यात आली होती. यापैकी ९५ हजार रुपये आरोपींनी यापूर्वीच स्वीकारल्याचे तक्रारीत नमूद असल्याची माहिती आहे.
या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या व्यावसायिकाने अंधेरी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत सापळा रचला. अंधेरी पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील आरसा हॉटेल येथे उर्वरित २५ हजार रुपये स्वीकारताना पोलिसांनी तिन्ही आरोपींना रंगेहात पकडल्याची माहिती आहे. तपासादरम्यान आरोपी कथितरीत्या संस्थेच्या नावाने तयार केलेल्या लेटरहेडचा वापर करून बांधकाम व्यावसायिक आणि इतर कंपन्यांविरोधात पालिका तसेच पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रारी करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या तक्रारींचा आधार घेत संबंधित व्यावसायिकांवर दबाव आणून पैसे उकळले जात असल्याचा आरोप आहे. पैसे न दिल्यास तक्रार कायम ठेवणे किंवा पालिकेच्या माध्यमातून कारवाईसाठी दबाव निर्माण करणे, अशा पद्धतीने ही टोळी काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. अंधेरी पूर्व, जोगेश्वरी आणि एमआयडीसी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून या टोळीचा वावर असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारामुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा आहे.
या टोळीने आतापर्यंत किती जणांकडून खंडणी उकळली, या प्रकारात आणखी कोणाचा सहभाग आहे आणि इतर तक्रारींमागेही याच आरोपींचा हात आहे का, याचा तपास अंधेरी पोलीस करत आहेत. दरम्यान, आरोपींवर विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याचा दावा करत त्यांच्याविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई करावी, अशी मागणी काही बांधकाम व्यावसायिकांकडून केली जात आहे.
मात्र, मकोका लागू करण्याबाबतचा अंतिम निर्णय तपासातील निष्कर्ष आणि कायदेशीर निकषांनुसार संबंधित यंत्रणांकडून घेतला जाईल. अंधेरी पोलिसांच्या या कारवाईमुळे तक्रारींचा दबाव निर्माण करून व्यावसायिकांकडून पैसे उकळण्याच्या कथित प्रकाराला आळा बसणार का, याकडे आता परिसरातील व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.