

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख आत्महत्या प्रकरण
स्वारगेट पोलिसांनी केली मोठी कारवाई
माजी आमदार रवींद्र धंगेकरांसह १४ जणांविरोधात गुन्हा
आत्महत्येपूर्वी त्यांनी व्हिडिओ आणि सुसाईड नोट तयार केली होती यामध्ये १४ जणांच्या नावाचा उल्लेख
पुण्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या केलेल्या प्रकरणात माजी आमदार आणि नगरसेवकासह १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम व्यावसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पुण्यातील स्वारगेट पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये शिंदेसेनेचा बडा नेता आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा देखील समावेश आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
बांधकाम व्यावसायिक खलील शेख (६५ वर्षे) यांनी गुरूवारी राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी व्हिडीओ शूट केले होते आणि सुसाईड नोट लिहिली होती. त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर मनसेचे नगरसेवक बाळासाहेब शेड यांच्यासह १४ जणांच्या नावाचा समावेश होता. रवींद्र धंगेकरांसह या सर्वांनी माझी आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी सुसाईड नोटमध्ये केला होता. याप्रकरणी सुल्ताना खलील शेख (५० वर्षे) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. यानंतर पोलिसांनी रवींद्र धंगेकर आणि बाळासाहेब शेडगे आणि या दोन्ही नेत्यांच्या बायकांसह सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला. आत्महत्येस प्रवृत्त तसेच विश्वासघात आणि जिवानिशी धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली.
स्वारगेट पोलिसांनी विशाल केदारी, सुनील अय्यर आणि त्यांचा मुलगा, रघु गौडा, सुनील बोरा, राजन सेठीया, हमीद भाई शेख आणि त्यांचा मुलगा, बाळासाहेब शेडगे आणि त्यांची पत्नी, रवींद्र धंगेकर आणि त्यांची पत्नी, शाम कोळपकर, शुभम या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. या कारवाईमुळे पुण्यात जोरदार चर्चा होऊ लागल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठेकेदार खलील शेख यांनी केलेल्या कामाचे पैसे अनेकांकडे थकले होते. मात्र ते मागून सुद्धा त्यांना ते परत मिळत नसल्याने ते आर्थिक विवंचनेत होते. दुसऱ्याकडून घेतलेले पैसे व्याजाने देत असल्यामुळे ते आर्थिक संकटात होते. पैसे मागून परत मिळत नसल्याने तसेच अनेक वेळा धमक्या आल्यामुळे त्यांनी स्वतःला संपवायचं ठरवलं. गुरुवारी दुपारी शेख यांनी राहत्या घरात त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्येपूर्वी व्हिडिओ तयार केला होता आणि सुसाईड नोट पोलिसांना घरात आढळून आली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.