मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर टेलिकॉम कंपनीकडून ड्रोन शो
शोदरम्यान दोन ड्रोनवरील नियंत्रण अचानक सुटले
दोन्ही ड्रोन चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या दिशेने येऊन प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर कोसळले
ड्रोनचा धक्का लागल्याने ३७ वर्षीय हेमंत महोत्सवकर जखमी
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या ड्रोन शोदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. टेलिकॉम कंपनीच्या ड्रोन शोमधील नियंत्रण सुटलेले दोन ड्रोन थेट चर्चगेट रेल्वे स्थानकात कोसळले. यातील एका ड्रोनचा धक्का लागल्याने रेल्वे स्थानकात उभा असलेला एक प्रवासी जखमी झाला. बुधवारी रात्री सुमारे ८.१० वाजण्याच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर ही घटना घडली. या प्रकारामुळे रेल्वे स्थानकात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, वानखेडे स्टेडियमवर टेलिकॉम कंपनीकडून ड्रोन शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आकाशात उड्डाण करणाऱ्या दोन ड्रोनवरील नियंत्रण अचानक सुटले. त्यानंतर हे दोन्ही ड्रोन भरकटत थेट चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या दिशेने आले. यातील एक ड्रोन प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरील विरारच्या दिशेकडील टोकावर आदळला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या ३७ वर्षीय हेमंत महोत्सवकर यांना ड्रोनचा जोरदार धक्का बसला.
ड्रोन डोक्याला आणि कपाळाला लागल्याने हेमंत यांच्या डोक्याला दुखापत झाली आणि रक्तस्राव सुरू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे स्थानकावरील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी प्रवाशाला मदत केली. त्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी रुग्णवाहिकेतून जीटी रुग्णालयात हलवण्यात आले.
दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत रेल्वे प्रशासनाने आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे. स्टेशन मास्टर यांनी जखमी प्रवाशाच्या उपचारासंदर्भात जीआरपीला मेमो दिला. त्यानंतर जीआरपीने घटनास्थळी पडलेले दोन्ही ड्रोन ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ड्रोनवरील नियंत्रण नेमके कशामुळे सुटले आणि ते थेट गर्दीच्या रेल्वे स्थानकात कसे कोसळले, याचा तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.