संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी
Mumbai Auto-Taxi Scam Busted: टॅक्सी आणि रिक्षांच्या भाडेमीटरमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरण बसवून कृत्रिम पद्धतीने भाडे वाढवत सर्वसामान्य प्रवाशांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा दहिसर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून पाच वाहने जप्त केली आहेत. जप्त केलेल्या वाहनांमध्ये दोन टॅक्सी, दोन रिक्षा आणि एका अर्टिगा कारचा समावेश आहे.
दहिसर परिसरातील अनेक टॅक्सी व रिक्षाचालक मीटरमध्ये विशेष यंत्रणेचा वापर करून बेकायदेशीररीत्या भाडेवाढ करत असल्याची गुप्त माहिती दहिसर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पुढील कारवाईचे नियोजन केले.
१ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजेच्या सुमारास एका बनावट प्रवाशाला टॅक्सी क्रमांक (MH 01 CJ 6487) मधून प्रवास करण्यासाठी पाठवण्यात आले. संबंधित टॅक्सीचालकाने भाडेमीटर झाकून ठेवले होते, तसेच त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी सदर टॅक्सी ताब्यात घेऊन प्रादेशिक परिवहन विभाग, बोरीवली (MH-47) च्या अधिकाऱ्यांच्या मदतीने तिची सखोल तपासणी केली.
तपासणीदरम्यान टॅक्सीच्या भाडेमीटरमध्ये 'इलेक्ट्रॉनिक रनिंग सर्किट' (डिव्हाइस) बेकायदेशीररीत्या जोडून फेरफार केल्याचे उघड झाले. या उपकरणाद्वारे प्रत्यक्ष प्रवासापेक्षा कितीतरी पटीने अधिक भाडे आकारले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, अशाच प्रकारे आणखी चार टॅक्सी व रिक्षांच्या भाडेमीटरमध्ये इलेक्ट्रॉनिक रनिंग सर्किट बसवून छेडछाड केल्याचे आढळले. पोलिसांनी तात्काळ सर्व वाहनांवर कारवाई करत ती जप्त केली. जप्त केलेल्या वाहनांमध्ये MH-01-CJ-6487, MH-02-DU-0777, MH-03-BY-4268, MH-02-BQ-7392 आणि MH-01-EM-6048 या गाड्यांचा समावेश आहे.
या प्रकरणी जोएब अल्ताफ देशमुख (३२), अमीन रमजान पठाण (३१), रियाझ अब्दुलगनी शेख (४५), नाजीर इब्राहिम पटेल (५७) आणि आनंद कुमार नानकप्रसाद राय (६०) यांच्याविरोधात दहिसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४) तसेच मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दहिसर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शिवाजी साळुंके आणि त्यांच्या पथकाने केली. मीटरमध्ये फेरफार करून प्रवाशांना लुटणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई सुरू केल्याने अशा गैरप्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.