केंद्रीय कौशल्य विभागामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सुरू असलेल्या ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज या बहुराज्यीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या मार्फत महाराष्ट्रात देखील या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
२१ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. या स्पर्धेत नवोन्मेषक, विद्यार्थी, विद्यार्थी गट, संशोधक, प्राध्यापक, स्टार्टअप्स, एमएसएमई, कंपन्या, सामाजिक संस्था, शैक्षणिक व संशोधन संस्था तसेच इतर इनोव्हेशन टीम्स सहभागी होऊ शकतात.
या चॅलेंजच्या माध्यमातून कृषी, आरोग्य, महिला सुरक्षा, नागरी विकास, पर्यावरण, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, शिक्षण आणि रोजगारक्षमता अशा विविध क्षेत्रांतील समस्या समजून सर्जनशील उपाय देणाची संधी शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंजसाठी कोणत्याही प्रकारची वयोमर्यादा नसून प्रत्येकाच्या सर्जनशीलतेला संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या नवोन्मेषांना राज्यस्तरीय व्यासपीठ असून यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे हीच आमची इच्छा आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार विशेषतः ग्रामीण भागातील मुलांचा यामध्ये सहभाग वाढवण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत, असे मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले.
'सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज' या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून आतापर्यंत तीन हजारांहून अधिक विद्यार्थी, युवक- युवतींनी नोंदणी केली. तसेच गोवा, दिव-दमण आणि छत्तीसगड या राज्यांतून सहा हजारांहून अधिक विद्यार्थी, युवक-युवतींनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील विद्यार्थी, युवक-युवतींकडूनही या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, नवकल्पना आणि संशोधनाच्या माध्यमातून आपल्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांचा सहभाग वाढत आहे, असेही मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
अर्ज कसा करावा?
या स्पर्धेमध्ये ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. https://sevainnovationchallenge.in/ या लिंकच्या माध्यमातून अथवा क्यूआर कोड स्कॅन करून इच्छुक स्पर्धेसाठी आपला प्रकल्प सादर करू शकतात. या पोर्टलवर पहिल्या स्तरावर प्राथमिक माहिती नोंदणीसाठी आवश्यक असेल; तसेच दुसऱ्या स्तरावर प्रकल्प सादर करताना आधार संलग्न वैयक्तिक माहिती आणि प्रकल्पाची माहिती उमेदवारांना सादर करावी लागणार आहे. सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असून उमेदवारांच्या शंकेचे निरसन करण्यासाठी चॅट बॉट सुविधा सुद्धा संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी दोन महत्वाचे सामंजस्य करार
मंत्रालयात सृजन ट्रस्ट, पुणे आणि विज्ञान भारती कोकण प्रांत या दोन्ही संस्थांसह कौशल्य विकास विभागाने सामंजस्य करार केला. या संस्थांच्या मदतीने स्पर्धेसाठी युवकांची विश्वविक्रमी नोंदणी होणार आहे असा विश्वास मंत्री लोढा यांनी यावेळी व्यक्त केला.
सामंजस्य कराराच्या माध्यमातून ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ची माहिती अधिकाधिक युवक-युवतींपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार असून, त्यांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करण्यासाठी सृजन ट्रस्ट, पुणे आणि विज्ञान भारती कोकण प्रांत या दोन्ही संस्था सहकार्य करणार आहेत.
प्रोजेक्ट रीपोर्ट तयार करणे, तसेच स्पर्धेसाठी आवश्यक मार्गदर्शन सुद्धा विज्ञान भारती कोकण प्रांत संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सृजन ट्रस्टच्या माध्यमातून या स्पर्धेचा व्यापक प्रचार व प्रसार करून युवक-युवतींचा सहभाग वाढवण्यात येणार आहे. सृजन ट्रस्टतर्फे दरवर्षी ‘डिपेक्स’ या उपक्रमाच्या माध्यमातून नवकल्पना, स्टार्टअप आणि उद्योजकतेच्या क्षेत्रातील युवकांसाठी परिषद आयोजित केली जाते. या उपक्रमामुळे नवकल्पना, संशोधन, स्टार्टअप आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या मोठ्या संख्येने युवक-युवतींशी ट्रस्टचा संपर्क आहे.
सृजन ट्रस्टचे विश्वस्त दीपक मुकादम, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, सृजन ट्रस्टचे डॉ. अमित नेहते आदी यावेळी उपस्थित होते
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.