लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर महायुतीचे नेते सतर्क झाले आहेत. त्यांनी आतापासूनच विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस राज्यातील विविध विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडी सोडून महायुतीत सामील झालेले अनेक नेते पुन्हा परतीच्या वाटेवर आहेत.
विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) येण्यासाठी या नेत्यांच्या पडद्यामागे हालचाली सुरू आहे. यातील बहुतांश नेते अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटातील आहेत. तर भाजपच्या काही नाराज नेत्यांनी देखील महाविकास आघाडीची कास धरण्याची तयारी दर्शवली आहे.
अशातच नवी मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी (Vidhan Sabha Election) नवी मुंबईत मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. नवी मुंबईतलं एक मोठं राजकीय कुटुंब महाविकास आघाडीत सामील होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या राजकीय कुटुंबातील सर्वच व्यक्ती शरद पवार आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संपर्कात असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. या राजकीय कुटुंबातील व्यक्तींचे त्यांच्या पक्षातील नेत्यांसोबत काही दिवसांपासून वाद सुरू आहे. याच वादातून ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.
त्यामुळे नवी मुंबईतील ते मोठं कुटुंब नेमकं कोण? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आमचे 45 हून अधिक खासदार निवडून येतील, असा दावा महायुतीने केला होता. मात्र, प्रत्यक्षात त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. 48 पैकी केवळ 17 जागांवरच महायुतीचे खासदार निवडून आले.
दुसरीकडे महाविकास आघाडीने मोठी मुसंडी मारत आपले 31 खासदार निवडून आणले. आता लोकसभेत लागलेल्या निकालावरुन विधानसभेतही महाविकास आघाडीला मोठं यश मिळणार अशी चर्चा आहे. अशातच भाजप आणि शिंदेंची साथ सोडत अनेक नेते विरोधकांच्या गळाला लागतील, असं बोललं जातंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.