Maharashtra Farmer: दुष्काळाच्या भीषण संकटामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं जगणं कठीण झालंय... ज्या हातांनी शेतात राबून सोन्यासारखं पीक घेतलं आणि लाखोंचं पोट भरलं; त्याच हातांवर आज स्वतःच्या कुटुंबाची भूक भागवण्यासाठी मुंबईच्या बाजारपेठेत हमाली करण्याची वेळ आलीय. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट भागातील शेतकरी पोटाची खळगी भरण्यासाठी थेट नवी मुंबईच्या एपीएमसीत दाखल झाले आहेत. पोटच्या लेकराप्रमाणे जपलेलं पीक डोळ्यांदेखत जळून गेल्यानं या शेतकऱ्यांवर आता हमालीची वेळ आलीय.
मुंबईत माणूस सकाळी उपाशी उठू शकतो मात्र उपाशी झोपत नाही असं म्हणतात....त्यामुळे अस्मानी आणि सुलतानी संकटानं बेजार झालेला शेतकरी एपीएमसी बाजारात मान झुकवून 50 ते 70 किलो वजनाच्या गोण्या पाठीवर वाहतोय. एकीकडे सरकारकडून आर्थिक मदतीच्या घोषणा केल्या जातात, मात्र डोंगराएवढ्या संकटासमोर ही मदत अगदीच तुटपुंजी ठरत असल्याची खंत व्यक्त करत आहेत.
दुष्काळामुळे शेतातच काही उगवले नाही, तर एपीएमसी बाजारात शेतमाल तरी येणार कुठून, अशी भीतीही या शेतकऱ्यांना सतावतेय. बाजारात मालच आला नाही, तर इथले कामही थांबेल आणि पुढील पावसाळ्यापर्यंत कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा, असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर निर्माण झालाय. लाखांचा पोशिंदा असलेल्या या बळीराजाला आता संकटसमयी मदतीची गरज आहे. सरकार ठोस मदतीच्या रुपात हात देणार का? याकडे शेतकऱ्याचं लक्ष लागलंय.
विकास मिरगणे,साम टीव्ही, वाशी
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.