राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Monsoon Session 2024) आठव्या दिवशी देखील विरोधक सरकारविरोधात आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आजच्या कामकाजाला सुरूवात होण्यापूर्वी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर सरकारविरोधात (Maharashtra Government) आंदोलन केले.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी टाळ घेऊन भजन करत सरकारविरोधात आंदोलन केले. विधानभवनाच्या पायऱ्यावर एकवटत विरोधकांनी शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन केले. 'रामकृष्ण हरी, शेतकरी फिरतोय दारोदारी', 'दुधाला भाव तरी द्या रे...', असे भजन म्हणत त्यांनी हे आंदोलन केले.
सरकारविरोधातील आंदोलनादरम्यान विरोधकांनी शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांचे फलक झळकावले आहेत. 'दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या', 'दूध भुकटी धोरण शेतकऱ्यांचे होते मरण', 'अनुदानाची कशाला दाखवताय आस भुकटी आयात करून पाडताय भाव', 'दुधाला नाही दर सरकार वसूल करते शेतकऱ्यांकडून कर' अशा वेगवेगळ्या शेतकरी प्रश्नांच्या आशयाचे फलक झळकावत विरोधकांनी सरकारविरोधात आंदोलन केले.
विजय वड्डेटीवार, बाळासाहेब थोरात, अजय चौधरी, जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर यासारख्या प्रमुख नेत्यांसह विरोधी पक्षांच्या आमदारांनी आंदोलन केले. विरोधकांनी आंदोलनावेळी शेतकरी प्रश्नांवरील भजन आणि अभंग म्हणत संपूर्ण विधानभवनाचा परिसर दणाणून टाकला. आंदोलन संपल्यानंतर विरोधक विधानसभेच्या कामाकाजासाठी सभागृहामध्ये निघून गेले. पण विरोधकांच्या या अनोख्या स्टाईल आंदोलनाची चांगलीच चर्चा होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.