पुणे : पुणे महानगरपालिकेत आज शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर जोरदार हल्ला केला. या घटनेचे राजकीय पडसाद आता उमटू लागले आहेत. आजच्या घटनेने पुन्हा एकदा शिवसेना (Shivsena) भाजप (BJP) यांच्यातील वितुष्ट वाढले आहे. सोमय्यांना झालेल्या मारहाणीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापणार आहे. (Kirit Somaiya Latest News)
हे देखील पहा :
सध्या सोमय्या यांच्यावर संचेती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून किरीट सोमय्यांच्या हाताला प्लॅस्टर करण्यात आले आहे. तसेच त्यांना दोन दिवस रुग्णालयातच ठेवले जाणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सोमय्या यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. यावेळी बोलताना पाटील यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. पाटील म्हणाले, किरीट सोमय्या यांच्या वर झालेला हल्ला हा प्राणघातक हल्ला होता. किरीट सोमय्या यांना मारण्याचा डाव राज्यसरकारनं रचला होता. हे सरकार गोरगरिबांचे नसून गुंडांचे सरकार असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
आज पुणे महानगरपालिकेत किरीट सोमय्या येणार होते. त्यांनी त्या आशयाचा कार्यक्रम देखील जाहीर केला होता. तरी देखील पोलीस प्रशासनातर्फे त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली नाही. आज जर केंद्राचे सुरक्षा रक्षक नसते तर किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांनी निश्चितच जीवे मारून टाकलं असतं असा दावा देखील चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांना झालेल्या मारहाणी विरोधात आम्ही स्वतःहून पोलिसात गुन्हा दाखल करणार नाही.
मात्र, या झालेल्या गंभीर घटनेची दखल स्वतःहून पोलिसांनी घ्यावी आणि त्यांनी स्वतःहून सुमोटो गुन्हा दाखल करावा. पोलिसांनी भादंवि कलम 307, 326 नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही कोर्टात जाऊन न्याय मिळवणार असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.