कल्याण रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरील ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड
बिघाडामुळे कसारा दिशेकडील डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत
लोकलसह काही एक्स्प्रेस गाड्या सुमारे ४५ मिनिटे उशिराने
प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आज सुट्टी निमित्त अनेक जण फिरण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. मात्र रेल्वेच्या लेटमार्कमुळे नागरिकांना मोठा फटका बसणार आहे. कारण कल्याण रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरील ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने कसारा दिशेकडील डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा काही काळ विस्कळीत झाली. या तांत्रिक अडचणीमुळे लोकलसह काही एक्स्प्रेस गाड्यांनाही खोळंब्याचा सामना करावा लागला. ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. तांत्रिक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दुरुस्तीच्या कामादरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने कल्याण स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ३, ४ आणि ५ वरील विद्युत पुरवठाही बंद करण्यात आला. त्यामुळे स्थानकातील रेल्वे वाहतूक व्यवस्थापनाचे मोठे आव्हान प्रशासनासमोर निर्माण झाले.
या बिघाडाचा थेट परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकावर झाला. लोकल तसेच काही एक्स्प्रेस गाड्या सुमारे ४५ मिनिटे रखडल्या. अचानक झालेल्या या तांत्रिक बिघाडामुळे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली. अनेक प्रवाशांना आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने प्रवास करावा लागला. कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला. दरम्यान, वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने पर्यायी व्यवस्थेचा वापर केला. काही गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ वरून चालवण्यात आल्या. त्यामुळे उपलब्ध मार्गांचा वापर करून रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
तांत्रिक पथकाकडून ओव्हरहेड वायरमधील बिघाड दुरुस्तीचे काम वेगाने सुरू होते. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आले. मात्र, या बिघाडामुळे काही काळ रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.