संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
गणेशोत्सव म्हटलं की आकर्षक सजावट, रोषणाई आणि विविध देखावे पाहायला मिळतात. मात्र कल्याण पूर्वेतील जय गणेश मित्र मंडळाने यंदा साकारलेला ‘नीट परीक्षा पेपरफुटी’चा देखावा समाजातील एका गंभीर आणि ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष वेधत आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या विषयाची प्रभावी मांडणी करण्यात आल्याने हा देखावा गणेशभक्तांसाठी विशेष लक्षवेधी ठरत आहे. मंडळाचे अध्यक्ष कृष्णा पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने हा देखावा साकारण्यात आला आहे. मंडळाचे यंदाचे हे ४० वे वर्ष असून, ‘नेतिवलीचा राजा’ या नावाने मंडळाचा गणपती प्रसिद्ध आहे.
नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि त्याचा विद्यार्थी व पालकांवर होणारा परिणाम या मुद्द्यांवर देखाव्यातून प्रकाश टाकण्यात आला आहे. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि विश्वासार्हता किती महत्त्वाची आहे, हा संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे. जय गणेश मित्र मंडळाकडून यापूर्वीही मराठी भाषा अभिमान, ऑनलाइन लॉटरी यांसारख्या सामाजिक आणि जनजागृतीच्या विषयांवर देखावे साकारण्यात आले आहेत. सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या या देखाव्यांची यापूर्वीही दखल घेत मंडळाला विविध पुरस्कार आणि पारितोषिके मिळाली आहेत.
विशेष म्हणजे मंडळाच्या मंडपात धार्मिक पावित्र्य आणि शिस्तीला विशेष महत्त्व दिले जाते. मंडप परिसरात स्वच्छता, शांतता आणि सुमधुर संगीताचे वातावरण राखत गणेशाचे पूजन केले जाते. त्यामुळे ‘नेतिवलीच्या राजा’च्या दर्शनासोबतच सामाजिक संदेश देणारा यंदाचा देखावाही गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून केवळ मनोरंजन न करता समाजातील ज्वलंत प्रश्नांवर भाष्य करण्याची परंपरा जय गणेश मित्र मंडळाने यंदाही कायम ठेवली असून, नीट पेपरफुटीचा देखावा विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत विचार करायला लावणारा ठरत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.