संघर्ष गांगुर्डे | साम टीव्ही न्यूज | कल्याण
Kalyan Gandhari Bridge : कल्याण-बापगावला जोडणाऱ्या महत्त्वाच्या गांधारी पुलावरील मोठमोठ्या खड्ड्यांकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पुलाची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत चालली असून, या मार्गावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असतानाही संबंधित यंत्रणा डोळेझाक करत असल्याचा संतापजनक आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
गांधारी पूल हा परिसरातील अत्यंत महत्त्वाचा आणि दळणवळणाचा मुख्य मार्ग मानला जातो. मात्र, सध्या पुलावर पडलेल्या प्रचंड खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना या खड्ड्यांचा सर्वाधिक फटका बसत असून, रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने येथे गंभीर अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या खड्ड्यांमुळे गाड्यांचा वेग मंदावून पुलावर रोज प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही, ज्यामुळे लहान-मोठे अपघात रोजचेच झाले आहेत.
याबाबत स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एखादा मोठा आणि प्राणघातक अपघात घडण्यापूर्वी प्रशासनाने जागे होऊन गांधारी पुलावरील खड्डे तातडीने बुजवावेत आणि सुरक्षित वाहतूक बहाल करावी, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.