नकली ग्राहकाच्या बहाण्याने ज्वेलर्सला बोलावून लुटले
सोनं आणि ५० हजार रुपये घेऊन आरोपी फरार
पोलिसांत गुन्हा दाखल
मानपाडा पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत
संघर्ष गांगुर्डे, डोंबिवली प्रतिनिधी
डोंबिवलीतून धक्कदायक बातमी समोर आली आहे. शहरातील एका ज्वेलर्सला घरात बोलावून ओलीस ठेवत लाखोंच्या दागिन्यांची आणि रोख रकमेची लूट केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना डोंबिवली पूर्वेतील आजदेगाव येथील जय मल्हार इमारतीच्या पाचव्या मजल्यावर २० नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. या घटनेतील आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना वराही ज्वेलर्सचे मालक नारायणलाल रावल यांच्यासोबत घडली आहे. ८ नोव्हेंबर रोजी ६०-६५ वयोगटातील वैशाली जाधव नावाच्या महिलेने रावल यांच्या दुकानात दागिन्यांची ऑर्डर दिली होती. रावल यांनी अॅडव्हान्स रक्कम मागितल्यानंतर महिलेने त्यांचा मोबाईल नंबर घेतला आणि तिची मुले आगाऊ पैसे देतील असे सांगितले. यानंतर बारा दिवसांनी, २० नोव्हेंबरला एका अज्ञात व्यक्तीने फोन करून अॅडव्हान्स देण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर बोलावले.
रावल हे दिलेल्या ठिकाणी पोहोचले. मात्र पत्ता ज्या घराचा होता त्या घरात दोन अनोळखी पुरुष होते. त्यांनी आई थेरपीसाठी गेल्याचे सांगून रावल यांना आत घेतले. त्यानंतर त्या दोन पुरुषांनी घराचा दरवाजा बंद केला, टीव्हीचा आवाज वाढवला आणि रावल यांनाबेदम मारहाण करत दोरीने बांधून ठेवले. एवढ्यावरच न थांबता रावल यांच्या जवळ असलेले ३ तोळे सोन्याचे दागिने आणि ५० हजारांची रोख रक्कम लुटून तिघेही फरार झाले.
दरोडेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढल्यानंतर रावल यांनी स्वतःची सुटका करत थेट पोलीस स्टेशन गाठलं. या प्रकरणी नारायणलाल रावल यांनी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तीन अज्ञात पुरुष आणि संबंधित महिलेवर दरोड्याचा गुन्हा नोंदवला आहे. दरोडेखोरांचा शोध वेगाने सुरू असल्याचे मानपाडा पोलिसांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.