रुपाली बडवे
कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरुन विरोधक सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरुन अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी देखील कंत्राटी भरतीवर टीका केली आहे. कंत्राटी भरतीच्या माध्यमातून आरक्षण संपवण्याचा घाट हे सरकार घालत आहे, असा दावा शेंडगे यांनी केला. (Latest Marathi News)
प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषद घेतओबीसी समाजाची विविध मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली. जरांगे पाटील यांच्या सभेमध्ये सरसकट कुणबी दाखले घेऊन मराठा समाज ओबीसीमध्ये समावेश करण्याची मागणी, मराठवाड्यामध्ये ओबीसीचा एल्गार महामेळाव्याची घोषणा, ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांच्यावरील जरांगे पाटील यांनी केलेली वैयक्तिक टीका, सरकारी नोकऱ्यातील ओबीसी समाजाचा अनुशेष व सरकारी नोकऱ्यामधील कंत्राटीकरण यावर प्रकाश शेंडगे यांनी भाष्य केलं. (Political News)
मनोज जरांगेंच्या सभेबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, आरक्षणाचा मागणी वाढत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सभा घेतली. आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. कारण आमचा त्यांच्या आरक्षणाला विरोध नाही. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याची त्यांनी जी मागणी केली आहे, त्याला आमचा विरोध आहे.
यापूर्वी मराठा समाजाने ५८ मोर्चे काढले. त्या सर्व मोर्चांना आम्ही समर्थन दिले. मोठा मेळावा घेतला म्हणजे आरक्षण मिळत असं नाही. केवळ सरकारवर दबाव येतो. मराठा आरक्षणाच्या प्रकरणात न्यायालयात बाजू मांडण्यात सरकार कमी पडलं. त्याची शिक्षा ओबीसी समाजाला का? असा सवालही प्रकाश शेंडगे यांनी उपस्थित केला.
ओबीसीचा महामेळाव्याची माहिती देताना शेंडगे यांनी सांगितलं की, हिंगोलीमध्ये १० नोव्हेंबर रोजी हा महामेळावा आयोजित करण्यात येणार आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही रस्त्यावर उतरु. मनोज जरांगे पाटील यांनी स्वत:ची अंत्ययात्रा काढण्यापेक्षा सरकारची अंत्ययात्रा काढावी. घटनेच्या मार्गाने गेलात तरच आरक्षण मिळेल, असा सल्लाही प्रकाश शेंडगे यांनी दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.