संघर्ष गांगुर्डे, डोंबिवली
डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. मिलापनगर आणि आसपासच्या निवासी भागात थेट एमआयडीसीच्या नळातून येणाऱ्या पाण्यात लालसर रंगाच्या अळ्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून हा प्रकार सुरू असून, पिण्याच्या पाण्यात अळ्या दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिलापनगरमधील काही बंगल्यांमध्ये नळातून येणाऱ्या पाण्यात लालसर अळ्या आढळल्या आहेत. विशेष म्हणजे, या अळ्या इमारतीच्या साठवण टाकीतून नव्हे, तर थेट एमआयडीसीच्या जलवाहिनीतून येणाऱ्या पाण्यात दिसत असल्याचा रहिवाशांचा दावा आहे. मिलापनगरमधील रहिवासी अश्विनी देशपांडे-कुलकर्णी यांना गेल्या दोन दिवसांपासून पाण्यात अळ्या आढळून येत होत्या.
त्यांनी तातडीने मिलापनगर रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशनचे सचिव अरुण जोशी आणि कार्यकारिणी सदस्य राजू नलावडे यांना याबाबत माहिती दिली. मंगळवारी गुरुनानक जयंतीनिमित्त एमआयडीसी कार्यालयाला सुट्टी असल्याने असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना संदेश पाठवून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
विशेष म्हणजे, महिनाभरापूर्वीही एमआयडीसीच्या पाण्याला तीव्र दुर्गंधी येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. त्यावेळी प्रशासनाने पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. मात्र, या तपासणीचा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
सध्या पाणीकपात सुरू असल्याने नागरिक आधीच पाणी जपून वापरत आहेत. त्यातच दूषित पाणीपुरवठ्यामुळे चिंता वाढली आहे. बालरोगतज्ज्ञांनीही या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. दूषित पाण्यामुळे कॉलरा, टायफॉईड, अतिसार, गॅस्ट्रोएन्टेरायटिस आणि कावीळ यांसारख्या आजारांचा धोका संभवतो, असे त्यांनी सांगितले.
एमआयडीसी प्रशासनाने तातडीने पाण्याचे नमुने तपासावेत, जलवाहिन्या आणि साठवण टाक्यांचे परीक्षण करावे तसेच दूषित पाणीपुरवठ्याचे कारण शोधून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. स्वच्छ आणि सुरक्षित पाणीपुरवठा करणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याने आता एमआयडीसी प्रशासन काय कारवाई करणार, याकडे रहिवाशांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.