काँग्रेस नेत्यावर बनावट जात प्रमाणपत्र वापरल्याचा आरोप
२००५ मध्येच नेत्याचे प्रमाणपत्र ठरवण्यात आले होते बनावट
२० वर्षांनंतर चेंबूर पोलिसांत गुन्हा दाखल
संजय गडदे, साम टीव्ही
बनावट जात प्रमाणपत्राच्या आरोपावरून काँग्रेस नेता अडचणीत आला आहे. गोवंडीमधील माजी महापालिकेतील नगरसेवक रमेश कांबळे यांच्यावर बनावट जात प्रमाणपत्राच्या आरोपावरून तब्बल २० वर्षांनी गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. रमेश कांबळे यांनी १९९८ मध्ये अनुसूचित जातीचे (SC) बनावट प्रमाणपत्र मिळवून २००२ मध्ये आरक्षित जागेवरून निवडणूक जिंकली, असा आरोप आहे.
२००५ मध्ये जात पडताळणी समितीने त्यांचे प्रमाणपत्र बनावट ठरवले होते, तसेच उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही हा निर्णय कायम ठेवला होता. तरीही त्यावेळी गुन्हा दाखल झाला नव्हता, मात्र आता तक्रारीनंतर चेंबूर पोलिसांनी फसवणूक आणि बनावट कागदपत्रे वापरण्याचे गुन्हे नोंदवले आहेत. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे द्यावा, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
गोवंडी परिसरात राहणारे रमेश कांबळे यांनी २००२ साली मुंबई महापालिकेतील प्रभाग क्रमांक १९२ मधून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढवली होती. तर राजेंद्र वाघमारे यांनी रिपाइंमधून (आठवले गट) निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत रमेश कांबळे यांनी राजेंद्र वाघमारे यांचा पराभव केला होता.
निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजेंद्र वाघमारे यांनी रमेश कांबळे यांच्या विरोधात कोकण भवन येथे जात पडताळणीसाठी अर्ज केला होता. जात पडताळणीत जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर लघुवाद न्यायालयाने कोकण भवनने दिलेला आदेश योग्य असल्याचे सांगून रमेश कांबळे यांचं नगरसेवक पद रद्द केलं होतं. त्यानंतर सहा महिन्यांसाठी राजेंद्र वाघमारे यांना नगरसेवकपद देण्यात मिळालं होतं.
या संपूर्ण प्रकरणात कांबळे यांनी उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टातही धाव घेतली. परंतु दोन्ही ठिकाणी कोकण भवनाचा आदेश योग्य असल्याचा निकाल देण्यात आला. आता या प्रकरणात गुरुवारी चेंबूर पोलिसांनी रमेश कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.