CM Eknath Shinde on Supreme Court Result: राज्याच्या सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निकाल दिला. कोर्टाने १६ आमदारांच्या अपात्रतेचा विषय विधानसभा अध्यक्षांकडे सोपावला आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं असून निकालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Breaking Marathi News)
"अखेर सत्याचा विजय झाला. मी आधीच सांगितलं होतं, की लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. देशात कायदा, घटना आहे. त्याच्याबाहेर कुणालाही जाता येणार नाही. आम्ही कायदेशीर पद्धतीनेच सरकार स्थापन केलं आहे. आजच्या निकालात काही कायदेशीर आणि तांत्रिक बाबींबद्दल देवेंद्र फडणवीसांनी माहिती दिली आहे. मी कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करतो", असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.
"सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अपेक्षित निकाल दिला. अपात्रतेचे अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे दिले. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयांच्या बाबतीतही सर्वोच्च न्यायालयाने भाष्य केलं. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला मान्यता दिली. पक्षचिन्हही आम्हाला दिलं आहे, आमच्याकडे बहुमत असल्याने बहुमताच्या आधारावर विधानसभा अध्यक्ष आमदार पात्र की अपात्र या विषयावर निर्णय घेतील", असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या टीकेवर सुद्धा एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. नैतिकतेचा विषय नाही, त्यांच्याकडे राजीनामा देण्याशिवाय दुसरा काही पर्याय होता का? असा सवाल शिंदेंनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्या अनेकांना ही चपराक आहे, असा टोला देखील शिंदेंनी ठाकरे गटाच्या नेत्यांना लगावला.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले राज्यपाल काय, सगळ्यांनाच माहिती होतं की त्यावेळचं सरकार अल्पमतात आलं होतं. आम्ही घटनात्मक बाबींची काळजी घेऊनच सरकार स्थापन केलं आहे. आम्ही हा निर्णय घेताना जनमताचा आदर केला आहे. खरंतर नैतिकता कुणी जपली, हे मला सांगण्याची गरज नाही, असा टोला सुद्धा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.