'बातमी जी व्यवस्था बदलेल' अशी ख्याती असलेल्या 'साम टीव्ही'ने पुणे विद्यापीठातील बोगस डीग्री घोटाळा उघडकीस आणला. साम टीव्हीचे रिपोर्टर सागर आव्हाड यांनी शोधपत्रकारिता करून यातील धक्कादायक वास्तव जगासमोर आणलं. विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यातील विद्यापीठातच हा प्रकार घडल्यानं विद्यार्थी आणि पालकांना धक्का बसला. साम टीव्हीच्या बातमीमुळं अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा झाली. या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागं झालं. दोषींवर कारवाईची मागणी होऊ लागली. साम टीव्हीच्या बातमीची दखल घेत या बोगस डीग्री प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे.
पुणे विद्यापीठातील बोगस डिग्री घोटाळा उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमली असून, अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात प्रशासकीय कारवाईला सुरुवात झाल्याचीही माहिती प्र-कुलगुरुंनी दिली आहे.
साम टीव्हीनं बोगस डिग्री घोटाळा उघडकीस आणल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाकडून पोलिसांत तक्रार देण्यात आली. रमेश मुखेकर आणि तक्रारदार महेश कदम यांना जबाब नोंदवण्यासाठी चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. मुखेकरची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्या सखोल चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती उघडकीस येण्याची शक्यता आहे.
'ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट' अशी ओळख असलेल्या पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कोणतेही प्रवेश न घेता बनावट डिग्री बनवून देण्याचा प्रकार समोर आला. विद्यापीठाने चौकशी समिती नेमली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अधिकारी आणि कर्मचारी चक्क ३ लाख रुपये घेऊन बनावट डिग्री प्रमाणपत्र देत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला. रिक्षावाल्याच्या मुलाला विद्यापीठातील कर्मचाऱ्याने बनावट डिग्री देतो म्हणून रिक्षाचालकाशी व्यवहार केला आणि मधेच हे व्यवहार फिस्कटल्याने हा प्रकार समोर आला.
१ तारखेला धम्मरत्न गायकवाड यांनी विद्यापीठाकडे तक्रार केली. विद्यापीठातील संबंधितांनी या तक्रारीची दखल घेतली नाही. यानंतर त्यांनी पत्रकार सागर यांच्याशी संपर्क साधला. सर्व पुरावे मिळाल्यानंतर सागर यांनी विद्यापीठात जाऊन तक्रारीची शहानिशा केली. हा प्रकार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याने विद्यापीठातील काही सूत्रांकडून रमेश मुखेकरची माहिती घेतली. तोपर्यंत खोलात जाऊन माहितीही घेतली. हे सर्व सुरू असताना साम टीव्हीवर बातमी प्रसारित झाली. त्यानंतर सामाजिक संघटना, राजकीय पक्षांनी परीक्षा विभागाच्या बाहेर नोटा उधळत आंदोलन केलं. हा घोटाळा उघडकीस आणणाऱ्या 'साम टीव्ही' आणि सागर यांचे आभार मानले.
जेव्हा साम टीव्हीकडे महेश कदम, धम्मरत्न गायकवाड हे तक्रार घेऊन आले होते तेव्हा त्यांचे पूर्ण निरसन साम टीव्हीने केलं. या बातमीची दखल घेत सामाजिक संघटना आक्रमक झाल्या होत्या आणि सोशल मीडियावरती दखल घेत अनेक प्रकारची धक्कादायक माहिती विद्यापीठातील भ्रष्टाचारासंदर्भात आता समोर यायला लागली आहे. मोठ्या प्रमाणात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भ्रष्टाचार सुरू आहे. दरम्यान, हा घोटाळा उघड करणाऱ्या साम टीव्हीचेही आभार मानले जात आहेत.
रिक्षाचालक महेश कदम यांनी सांगितले की, माझी परिस्थिती ही हलाखीची असून, माझ्या मुलाचे बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर कमवा व शिका योजनेत त्याला पुढील शिक्षण मिळावं म्हणून मी सावित्रीबाई फुले विद्यापीठात चौकशी करण्यासाठी गेलो होतो. तेव्हा वित्त व लेखा विभागातील रमेश मुखेकर यांची भेट झाली आणि त्यांना मी पुढील शिक्षणाबाबत विचारलं तेव्हा ते म्हणाले की, ३ वर्षे शिक्षण घेण्यापेक्षा तुम्ही तीन लाख रुपये द्या. आम्ही डायरेक्ट तिन्ही वर्षांचा निकाल आणि डिग्री देतो असं त्यांनी सांगितलं. तेव्हा मी सांगितलं की एवढे पैसे नाहीत. तेव्हा कमी जास्त करत आमच्यात दीड लाखांमध्ये हा व्यवहार ठरला.
मग मी पहिल्यांदा रमेश मुखेकर याला ५० हजार गुगल पे केल्यावर त्याने माझा मुलगा साहिल महेश कदम या नावाने तिन्ही वर्षाचा निकाल दिला. मग मी परत त्याला २० हजार ऑनलाईन दिले आणि ठरलं की जेव्हा तो डिग्री देईल तेव्हा पूर्ण रक्कम देऊ आणि मग मुखेकरने मला व्हॉट्सॲपवरच माझ्या मुलाच्या नावाने बीकॉमच डिग्री सर्टिफिकेट पाठवलं. ज्यात माझ्या मुलाचं ऍडमिशन वाडिया कॉलेज दाखवलं. पण जी डिग्री दिली त्यावर युनिव्हर्सिटी ऑफ पुणे असं होतं पण विद्यापीठाचं नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं असल्याने मला संशय आला आणि मी रिपब्लिकन पार्टीचे डॉ. धम्मरत्न गायकवाड यांना भेटलो आणि त्यांच्या माध्यमातून विद्यापीठ प्रशासनाला भेटून सर्व पत्रव्यवहार केला. या बनावट डिग्री रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महेश कदम यांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.