मुंबईत साकी नाका परिसरात आणखी एका निष्पाप मुंबईकराचा बळी गेला! ही दुर्घटना नव्हती तर हा खून आहे. जाणत्यापणे घेतलेला हा बळी आहे.आणि याला मुंबई महापालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत. या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्यानंतर तब्बल ४ तासांनी हे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यातले पहिले आहेत पालिकेचे सहाय्यक अभियंता दीपक चौगुले.
चौगुलेंना जेव्हा साम टीव्हीने जाब विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, ही घेराबंदी तोडून जेव्हा आमच्या प्रतिनिधीने या मुजोर अधिकाऱ्याला कॅमेऱ्यासमोर घेरलं, तेव्हा त्याने दिलेली ही बेजबाबदार उत्तरं पाहा.
ऐकलंत? हा अधिकारी कॅमेऱ्यासमोर अत्यंत निर्लज्जपणे सांगतोय की, मी नाईट शिफ्टला होतो जर हा साहेब नाईट शिफ्टला होता, तर मग भरपावसात इथे काय पर्यटनासाठी आला होता का? यानंतर 'साम टीव्हीनं वॉर्ड ऑफिसर धनाजी हर्लेकर यांना गाठलं. आणि प्रश्नांच्या कचाट्यात पकडलं, तेव्हा मात्र त्यांची पुरती भंबेरी उडाली. स्वतःच्या वॉर्डात काय घडलंय, याची साधी माहितीही या वॉर्ड ऑफिसर साहेबांना नव्हती. तर दुसरीकडे, परिमंडळ आयुक्त संध्या नांदेडकर यांनी थोडं थांबा, थोडं थांबा म्हणत कशी वेळ मारून नेली, तेही ऐका.
या अस्लम शेख यांचा बळी घेणाऱ्या चार अधिकाऱ्यांचं निलंबन केल्याची घोषणा आयुक्त अश्विनी भिडे यांनी केली. अस्लम शेख यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या या वॉर्डमधल्या एकाही अधिकाऱ्याला समाधानकारक उत्तर देता आलं नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांना पदावर राहण्याचा अधिकार आहे का? यापूर्वीही मॅनहोलमुळे चार जणांचा बळी गेलाय.
मात्र त्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेले अधिकारी छाती काढून आजही खुर्च्या उबवत आहेत. त्यामुळे निलंबनाची कारवाई करून हे गेंड्याच्या कातडीचे अधिकारी कधीही सुधरत नाहीत. यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून यांना कायमचं घरी पाठवायला हवं. त्याशिवाय इतर अधिकाऱ्यांना जरब बसणार नाही. अखेर प्रश्न मुंबईकरांच्या जीवाचा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.