ठाकरे बंधूंची युती झाल्यास मुंबई महापालिकेत फायदा
मनसेची मतं 70 वॉर्डमध्ये ठरणार निर्णायक
महायुतीला उपनगरात जास्त फायदा होण्याची शक्यता
मुंबई शहरात मविआचं पारडं जड
राज्यात महापालिका, जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. पण मुंबई महापालिका निवडणूक आणि या निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? या दोन मुद्द्यांभोवती सध्या चर्चा घोंघावतेय. जवळपास आठ वर्षांनंतर महापालिकेची निवडणूक होत आहे. ती जानेवारी २०२६ मध्ये होऊ शकते, असा अंदाज बांधला जात आहे. मागील विधानसभा निवडणुकांच्या मतांच्या आकडेवारीचा विचार केला तर, राज्यातील सत्ताधारी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा उपनगरांमध्ये वरचष्मा आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह महाविकास आघाडीची ताकद मुंबई शहर आणि मध्य मुंबईत दिसून येत आहे. दुसरीकडं मतांमध्ये किमान फरक आणि मनसेची मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
मागील विधानसभा निवडणुकीतील मतांच्या आकडेवारीवरून इंडियन एक्स्प्रेसनं केलेल्या विश्लेषणानुसार, मुंबई महापालिकेच्या २२७ पैकी १३३ वॉर्डांमध्ये महायुती आघाडीवर होती. तर महाविकास आघाडीचं ९४ वॉर्डांमध्ये पारडं जड राहिलं होतं. काही ठिकाणी खूप तगडी लढत झाली होती. अगदी कमी मतांच्या फरकानं निकाल लागला होता. ३२ वॉर्डांमध्ये तर एक हजारांपेक्षा कमी मते, तर अन्य ५५ वॉर्डांमधील निकाल दोन हजारांपेक्षा कमी मतांवर ठरला होता. याचाच अर्थ शहरातील जवळपास दोन तृतियांश भागात मते काही प्रमाणात 'इकडे-तिकडे' झाली तर मुंबई महापालिकेचा निकाल बदलू शकतो.
महापालिका निवडणुकीत यावेळी कुठलीही राजकीय लाट नसेल, असे बोलले जात आहे. मतांमधील फरक आणि रस्त्यावरील खड्डे, कचरा, पुनर्विकास, पाणीपुरवठा आदी स्थानिक मुद्द्यांवर या निवडणुकांचा निकाल अवलंबून असेल. संपूर्ण मुंबईचा विचार केला तर, २२७ पैकी ८७ वॉर्डांमधील निकाल तीन हजारांपेक्षा कमी मतांवर ठरला होता. त्यातील ४७ वॉर्डांमध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला होता. तर महायुतीची ४० वॉर्डांत सरशी झाली होती. माहीमसारख्या ठिकाणी महाविकास आघाडीला अवघ्या ४४ मतांची आघाडी होती. भांडुप पश्चिममध्ये ७१ मतांची आघाडी होती. दिंडोशीमध्ये महायुतीची अवघ्या दोन मतांनी सरशी झाली होती. यावरून असे दिसते की, मतांच्या टक्केवारीतील काहीअंशी फरक आणि उमेदवार बदलल्यानं त्याचा डझनभर वॉर्डांमधील निकालावर परिणाम होऊ शकतो. राजकीय विश्लेषकांच्या मते, बूथ पातळीवरील व्यवस्थापन आणि स्थानिक आघाड्या निर्णायक ठरू शकतात.
विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या पॅटर्ननुसार, उपनगरांमधील बोरिवली ते मुलुंडपर्यंत बऱ्याचअंशी महायुतीच्या बाजूने कौल दिला गेला. या परिसरातील ९० पैकी ७० हून अधिक वॉर्डांमध्ये महायुती आघाडीवर होती. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला हे सगळं श्रेय जातं. याउलट वरळी, दादर, भायखळा, मुंबादेवी आदी भागात महाविकास आघाडीनं आपलं वर्चस्व राखलं. मराठी बहुल भाग, अल्पसंख्याक मतदारांच्या पाठिंब्यामुळं ६० पैकी ४० वॉर्डात आघाडी मिळाली. एका ज्येष्ठ राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, उपनगरांत मध्यमवर्गीय मराठी, गुजराती आणि उत्तर भारतीय मतदारांचा दबदबा आहे. तो सगळा वर्ग साधारणपणे महायुतीच्या बाजूने आहे. तर मुंबई शहरात मराठी नोकरदार वर्ग आणि अल्पसंख्याक मतदाराचा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे.
मुंबईत २०२४ च्या निवडणुकीत जवळपास ३.९ लाख मते मनसेला मिळाली
त्यामुळं राज ठाकरेंच्या मनसेची भूमिका जवळपास ७० वॉर्डांमध्ये निर्णायक ठरू शकते.
६७ वॉर्डांमध्ये जे मार्जिन आहे, त्यापेक्षा जास्त मते मनसेला मिळाली.
तर अन्य १० वॉर्डांमध्ये जो विजयी मतांमधील फरक होता, त्याच्या जवळपास मते मनसेला मिळाली होती.
२५ वॉर्डांमध्ये तर महाविकास आघाडीला जी अर्धी मते मिळाली होती, त्यापेक्षा जास्त मते मनसेला मिळाली.
३७ वॉर्डांमध्ये ३० ते ४९ टक्क्यांच्या दरम्यान मते मिळाली.
विशेष म्हणजे अन्य आठ वॉर्डांमध्ये महाविकास आघाडीला मिळालेल्या मतांपेक्षा जास्त मते मिळाली होती.
एकूणच काय तर मनसेमुळे जवळपास मुंबईतील अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजेच १२३ वॉर्डांमध्ये निकाल बदलल्याचे दिसून येते.
राज ठाकरेंना सोबत घेऊन निवडणूक लढवणे उद्धव ठाकरेंसाठी अत्यंत महत्वाचे आहे.
महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणे महत्वाचे आहे, असे राजकीय जाणकार म्हणतात.
मनसे किमान ७० वॉर्डांमधील निकाल बदलू शकते. राज ठाकरे यांच्या मदतीनं उद्धव ठाकरे मराठी मतांची मोट बांधू शकतात.राजकीय विश्लेषक
दादर, माहीम, सायन, विक्रोळी, कुर्ला आणि अंधेरीचा काही भाग हा मनसेचा गड मानला जातो. हा सर्व भाग मराठी बहुल आहे.
माहीम, वरळी, वांद्रे पूर्व यांसारख्या हायव्होल्टेज भागात मनसे उमेदवारांना मताधिक्यापेक्षा अधिक मते मिळाली आहेत.
त्याचा अप्रत्यक्षरित्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराला फायदा झाला. वरळीत ठाकरेंच्या शिवसेनेचे आदित्य ठाकरे हे १३४२ मतांनी आघाडीवर होते. तर मनसे उमेदवाराला १९९७ मते मिळाली आणि ही मते इथला निवडणूक निकाल बदलण्यास पुरेशी ठरली होती.
२०२२ मध्ये शिवसेना फुटली. शिवसेनेचे दोन गट पडले. ठाकरे आणि शिंदे अशा दोन गटांत शिवसेना विभागली गेली. आतापर्यंत मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा (संयुक्त) दबदबा राहिला आहे. मुंबई ही शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. शिवसेना फुटीनंतर मुंबई महापालिकेची ही पहिलीच निवडणूक असणार आहे. त्यामुळे ठाकरेंसाठी ही निवडणूक एकप्रकारे कसोटी असणार आहे. मुंबईकर विशेषतः येथील मराठी मतदार अजूनही ठाकरेंच्याच बाजूने आहे का, हे निवडणूक निकालानंतरच कळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.