BJP uses Marvel characters in Mumbai BMC election campaign : देशाची आर्थिक राजधानी मायानगरी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात पोहचलाय. १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. २२७ प्रभागासाठी मुंबईत भाजपने कंबर कसली आहे. मुंबईतील प्रचाराच्या मैदानात भाजपने बाजी मारली आहे. कारण, सभा रॅली यासोबतच भाजपकडून डिजिटल प्रचारावर जोर दिलाय. अधिनिक तंत्रज्ञानाचा वापर करत भाजपने प्रचारात रंगत निर्माण केली आहे. स्टोनी स्टार्क, हल्क, थानोस, स्पयडरमॅन यासारख्या जागतिक पात्रांना प्रचारात उतरवले. पण ते डिजिटल स्वरूपात. भाजपने सिनेमॅटिक 'मार्व्हल' युनिव्हर्सचा आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने कल्पक वापर आणि आक्रमक प्रचार केलाय. यामुळे भाजपने मुंबईच्या तरुण मतदारांच्या मनावर गारूड घातल्याचे चित्र आहे.
भाजपचा'मार्व्हल' अवतारात प्रचार
'एआय' (AI) जनरेटेड व्हिडिओ कॅम्पेन हे यावेळच्या निवडणुकीचे सर्वात मोठे आकर्षण ठरले आहे. टोनी स्टार्क (आयर्न मॅन), थानोस, स्पायडरमॅन आणि हल्क यांसारख्या प्रसिद्ध पात्रांना चक्क मुंबईच्या निवडणुकीच्या रिंगणात भाजपने उतरवून प्रचारात आघाडी घेतली. भाजपकडून प्रचाराची व्याख्याच बदलून टाकली आहे. हे सुपर हिरो मुंबईच्या विकासावर आणि समस्यांवर भाष्य करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच मतदान करणारा वर्ग आकर्षित होत आहे. काँग्रेससारख्या पक्षांनीही या ट्रेंडचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला, मात्र तांत्रिक अचूकता आणि संदेशाची स्पष्टता यामुळे भाजप या शर्यतीत 'एंडगेम'च्या फायनल टचपर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे.
भाजपने निवडणुकीच्या प्रचारात फक्त मनोरंजनावर भर दिलेला नाही. त्याऐवजी त्यांनी एकदम स्पष्ट आणि ठाम घोषणा दिली. "त्यांच्या भूलथापांना भुलणार नाही, मुंबई आता थांबणार नाही." या घोषणेद्वारे मतदारांना एक खंबीर पर्याय दिला आहे. ही घोषणा केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित न राहता, ती प्रत्येक बॅनर, पोस्टर आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकसमान पद्धतीने मांडली जात आहे.विशेष म्हणजे, शिवसेना (UBT) यांनी आधी रेडिओवर जाहिराती दिल्या होत्या, त्यात त्यांचा संदेश होता. भाजपने त्याच संदेशाचा वापर करून उलटवार केला आहे
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (UBT)कडून ‘कोस्टल रोड’सारख्या मोठ्या प्रकल्पांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण मुंबईच्या जागरूक मतदारांमध्ये याबाबत मोठी शंका आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेल्या प्रकल्पांचे आणि मागील प्रशासनाने केलेल्या कामांचे श्रेय आता लाटण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे, यावर टीका होऊ लागली आहे. शिवसेना (UBT) ज्या वेगाने प्रकल्पांवर श्रेय घेत आहे, त्यावरून मुंबईच्या कट्ट्यांवर आता अशी बोलणी होत आहेत की, “उद्या हे लोक ‘जागतिक शांतता’ आणल्याचे श्रेयही स्वतःकडेच घेतील का?” फक्त होर्डिंग लावून आणि जुन्या कामांवर आपला शिक्का मारून मुंबईचा विकास झाला असा भास निर्माण करणे आता कठीण झाले आहे. कारण भाजपने आपल्या डिजिटल मोहिमेतून प्रत्यक्ष प्रगती आणि पुढील काळातील दृष्टीकोन स्पष्टपणे मतदारांसमोर ठेवला आहे.
आजच्या युगात ज्याच्याकडे लोकांचे लक्ष जातं, त्याचेच राजकारण यशस्वी होतं. भाजपने हे सूत्र चांगलं समजलं आहे आणि लांबलचक भाषणांऐवजी 'शेअरेबल' आणि 'रिकॉल व्हॅल्यू' असलेलं कंटेंट तयार करण्यावर भर दिला आहे. इन्स्टाग्राम रील्स, व्हॉट्सॲप स्टेटस आणि युट्यूब शॉर्ट्सच्या माध्यमातून भाजपचे मेसेज प्रत्येक मुंबईकराच्या मोबाईलपर्यंत पोहोचले आहेत. यामुळे विरोधकांचा पारंपारिक प्रचार भाजपच्या या डिजिटल झंझावातासमोर फिका पडत असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. मुंबई महानगरपालिकेची ही लढाई आता फक्त रस्ते आणि नालेसफाईपुरती मर्यादित राहिलेली नाही. ही लढाई आहे 'नॅरेटिव्ह'ची. एकीकडे जुन्या कामांचे श्रेय घेणारी शिवसेना (UBT) आहे, तर दुसरीकडे आधुनिक तंत्रज्ञान, तरुण पिढीची भाषा आणि भविष्यातील विकासाचा रोडमॅप घेऊन आलेला भाजप आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.