म्हाडाकडून मध्यमवर्गीयांसाठी खूशखबर
म्हाडाकडून भाडेतत्त्वावरील घरांच्या धोरणाचा प्रारूप मसुदा सादर
हितधारकांना रचनात्मक सूचनांचे आवाहन
संजय गडदे, साम टीव्ही
महाराष्ट्राच्या शहरी विकासात भाडेतत्त्वावरील घरे ‘मुख्य प्रवाहातील पर्याय’ म्हणून स्वीकारण्याची गरज अधोरेखित करत म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी राज्य भाडेतत्त्वावरील घरांच्या नव्या धोरणाबाबत हितधारकांना रचनात्मक सूचना देण्याचे आवाहन केलं. वांद्रे येथील सभागृहात आयोजित मसुदा सादरीकरण आणि चर्चासत्रात जयस्वाल यांनी धोरणाची प्रमुख तत्त्वे आणि भावी अंमलबजावणी प्रक्रियेची माहिती दिली.
परवडणारी, सर्वसमावेशक, पारदर्शक आणि सुलभ अशी चार मूलभूत तत्त्वे लक्षात घेऊन तयार करण्यात आलेले हे धोरण बदलत्या सामाजिक-आर्थिक गरजांना पूरक आहे, असे त्यांनी सांगितले. तरुण पिढी, स्थलांतरित कामगार, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, प्रकल्पग्रस्त, वैद्यकीय व्यावसायिक आणि इतर विविध गटांसाठी सुरक्षित भाडेघरे उपलब्ध करणे हे धोरणाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाडेकरू व्यवस्थापनापासून ऑनलाइन दस्तऐवजीकरणापर्यंत सर्व सोयी एकाच प्लॅटफॉर्मवर देणारे ‘स्मार्ट रेंटल हाऊसिंग पोर्टल’ विकसित करण्याची तरतूदही मसुद्यात आहे. खासगी विकासकांचा सहभाग वाढावा यासाठी जीएसटी, स्टॅम्प ड्युटी, मालमत्ता कर सवलत, विकास शुल्कात ५० टक्के सूट, टीडीआर आणि शिथिल एफएसआय अटी यांसारख्या प्रोत्साहनात्मक उपायांचा प्रस्ताव करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेला हा मसुदा देशभरात अशा प्रकारचे सर्वसमावेशक धोरण सादर करणारा पहिला उपक्रम असल्याचेही जयस्वाल यांनी सांगितले. चर्चासत्रात नवी मुंबईचे आयुक्त कैलास शिंदे, केडीयएमसीचे आयुक्त अभिनव गोयल, तसेच बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी अणि बोमन इराणी यांनी धोरणाबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. परवानग्या वेळेत मिळाल्यास धोरणाची प्रभावी अंमलबजावणी शक्य होईल, असेही मत मांडण्यात आले. कार्यक्रमाला शासन व म्हाडाच्या विविध अधिकारी तसेच क्रेडाई, एमसीएचआय, नारेडकोचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.