विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येतेय तसं सत्ताधाऱ्यांवर आरोपांची धार वाढत आहे. त्यातही राज्याचं आरोग्य खातं वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा झाल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी झाला होता. कंपन्यांना नियमबाह्य पद्धतीने निविदा देऊन गैरव्यवहार केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.
आता स्वच्छतेच्या नावाखाली सार्वजनिक आरोग्य विभागात 3200 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय. संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरिय चौकशी करुन टेंडर तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 21 एप्रिल 2022 रोजी स्वच्छतेच्या टेंडरच्या प्रक्रीयेसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली. राज्यातील आठ सर्कलमध्ये 27 हजार 869 बेडना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. पूर्वी ही प्रशासकीय मान्यता केवळ 77 कोटी 55 लाख 18 हजार रूपयांची होती.18 सप्टेंबर 2023 रोजी या मान्यतेत 638 कोटींची वाढ करण्यात आली.
आर्थिक शिस्तीचा भंग करून टेंडर फुगविले गेले, असा आरोप आहे. कोर्टाच्या चपराकीनंतर आरोग्य मंत्र्यांनी घाईगडबडीत टेंडर पुन्हा काढले, असंही बोललं जात आहे. 30 ऑगस्ट 2024 रोजी खरेदी समितीची बैठक झाली. राज्यातील 8 आरोग्य उपसंचालकांना केवळ मर्जीतल्या कंपन्यांना काम देण्याचा दबाव असल्याचा आरोप आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसोबत बसल्यानंतर बाहेर आल्यावर आम्हाला उलट्या होतात, असं धक्कादायक वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं होतं. महायुतीत सतत वादग्रस्त वक्तव्य करणारे सावंत घोटाळ्यांच्या आरोपामुळेही घेरले गेलेत. विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालंय. एव्हढं मात्र निश्चित.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.