संजय गडदे
mumbai Crime News: सोशल माध्यमातून नागरिकांना स्वस्तात विमान तिकिटं मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात मुंबई पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरात गुन्हेगारांकडून अनधिकृतपणे कॉल सेंटर चालवत नागरिकांची फसवणूक केली जात असे. पोलिसांनी या कॉल सेंटरवर छापा टाकून एकूण बारा जणांना अटक केली आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील मरोळ एमआयडीसी परिसरात नागरिकांना स्वस्तात विमान तिकीट देण्याचे आमिष दाखवून फसवणाऱ्या एका अनधिकृत कॉल सेंटर संदर्भात गुन्हे शाखा कक्ष नऊचे प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांना 10 ऑगस्ट रोजी माहिती मिळाली. यानंतर मरोळ भागातील हसनपाडा रोड येथील ३०१/ए, मित्तल कमर्शिया येथे गुन्हे शाखा कक्ष नऊच्या तपास पथकाने छापेमारी केली.
या ठिकाणी अनधिकृत कॉल सेंटरच्या माध्यमातून विमान प्रवासास इच्छुक ग्राहकांना सोशल माध्यमाद्वारे जाहीरात करून जाळ्यात अडकवले जात असे. प्रतिसाद देणाऱ्या ग्राहकांना स्वस्तात विमान तिकीट मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना तिकीटाची रक्कम हस्तांतरीत करण्यास लावत. त्यानंतर बनावट विमान तिकीटे व बिले पाठवून त्यानंतर रक्कम प्राप्त होताच त्यांच्याशी असलेला संपर्क तोडून मोठया प्रमाणावर फसवणूक करत असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी कारवाई करत एकूण १२ पुरुष व एका महिलेला अटक केली आहे. कोणताही परवाना न घेता अनधिकृत कॉल सेंटर चालवित जात होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या ताब्यातून २८ लॅपटॉप, ४० मोबाईल फोन, 3 राऊटर व गुन्हयाविषयी इतर कागदपत्रे असे एकूण ७,२९,०००/- एवढया किंमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात आलेली आहे.
अटक आरोपींविरोधात सहार पोलीस ठाणे येथे कलम ४१९, ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४, १२० (ब) भादविसह कलम ६६ (क), ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आली आहे. गुन्हयातील अटक आरोपीना अतिरिक्त महानगर दंडाधिकारी, त्यांच्यासमोर हजर केले असता या सर्व आरोपींना 14 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष-८ चे लक्ष्मीकांत साळुंखे, मधुकर धुतराज, मनोजकुमार प्रजापती, राहुल प्रभु, शिरसाट, चव्हाण, यादव, सिंह, कुरकूटे, कांबळे, रहेरे, सटाले, गायकवाड, भिताडे, बिडवे, साळवे, सुतार यांनी ही कामगिरी पार पाडली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.