चेतन व्यास
Wardha Crime News : वर्धा जिल्ह्यातील तळेगाव (श्या.पंत) येथील सत्याग्रही घाटात एक हत्याकांडाची धक्कादायक घटना घडली होती. अनोळखी महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. चारित्र्यावर संशय घेत महिलेला सत्याग्रही घाटात दगडाने ठेचून जिवंत जाळले. जेव्हा पोलिसांनी या ‘ब्लाईंड मर्डर मिस्ट्री’चा उलगडा केला आहे. (Latest Marathi News)
याप्रकरणी मृतक महिलेच्या पतीसह त्याचा मावस भाऊ गजाआड गेला. ज्योत्सना मनिष भोसले (३२) रा. मंगरुळ चव्हाळा जि. अमरावती असे मृतक महिलेचे नाव आहे. पोलिसांनी अटक केलेल्यात मनिष इंग्लिश भोसले, प्रवीण परमीट पवार असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.
१० डिसेंबर २०२२ रोजी सत्याग्रही घाटात अनोळखी महिलेचा जळालेल्या, कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेसह तळेगाव पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला. विशेष म्हणजे या हत्याकांडात कुठलाही पुरावा पोलिसांना मिळत नव्हता.
पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कडवे यांच्या मार्गदर्शनात तब्बल ४० दिवस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड सहस्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके, तळेगाव पोलिसांच्या २ आणि आर्वी येथील १ अशा एकूण सहा पथकांतील जवळपास ५० पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रकरणाचा तपास केला.
मृतक महिलेची ओळख पटविण्यासाठी मृतकाच्या शरिरावर मिळून आलेल्या दागिने तसेच चपलांवरुन पोलिसांनी वर्धा, नागपूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा तसेच मध्यप्रदेश राज्यातील छिंदवाडा, पांढरकवडा, मुलताई, आठनेर, बैतुल आदी गावांतील सुमारे तीन हजारांवर मिसिंग असलेल्या महिलांबाबत पोलिस स्टेशन तसेच सीटीझन पोर्टलवर पाहणी करुन शोध घेण्यात आला. तसेच बेनटेक्स दागिने विक्रेते, कापड विक्रेते, टेलर व चप्पल विक्रेत्यांकडूनही शाहनीशा केली.
एवढंच नव्हे तर पोलिसांनी पेट्राेलपंप, हॉटेल्स, पंक्चर दुरुस्ती दुकाने, हायवेवरील ३५ ते ४० ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तसेच विशिष्ट समाजाच्या अनेक ठिकाणच्या तांडे व बेड्यांवर मतदार यादीच्या मदतीने जवळपास दीड ते दोन हजार महिलांची तपासणी करण्यात आली. तसेच आशावर्करकडे असणाऱ्या यादीवरील २०० महिलांची चाैकशी करुन शोधही पोलिसांनी घेतला.
अखेर मंगरुळ चव्हाळा येथील ज्योत्सना भोसले काही दिवसांपासून वडाळी, अमरावती शहर येथे लग्नासाठी गेल्यानंतर परतली नसल्याने ती मिसिंग असल्याने तिचा शोध अमरावती येथील फ्रेजरपुरा पोलिसांकडून सुरु असल्याचे समजले.
दरम्यान, पोलिसांनी मुंबई येथे राहणाऱ्या ज्योत्सनाची आई आणि नातेवाईकांना तळेगाव पोलिसांत बोलावून घटनास्थळी मिळालेली साडी, चप्पल दाखविल्या असता ते साहित्य ज्योत्सनाचे असल्याचे त्यांनी सांगितले अन् पोलिसांनी तब्बल ४० दिवसांच्या तपासानंतर ब्लाईंड मर्डर मिस्ट्रीचा उलगडा करुन आरोपी पती मनीष भोसले आणि प्रवीण पवार यांना अटक करुन बेड्या ठोकल्या.
वर्धा पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेसह तळेगाव पोलिसांनी तब्बल ४० दिवस दिवसरात्रं एक करुन तपास केला. तपासदरम्यान पोलिसांना ज्योत्सनाचा पती मनिष भोसले आणि त्याचा मावस भाऊ प्रवीण पवार यांच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या.
त्यांचा नेर जि. यवतमाळ येथील विविध पारधी बेड्यांवर शोध घेतला. अखेर तांत्रीक पद्धतीने शोध घेतला असता ते दोघेही सातेफळ येथील जंगलात असल्याचे समजले.
पोलिसांनी दोन्ही आरोपींचा कसून शोध घेत अख्खा जंगल परिसर पिंजून काढला आणि पाठलाग करुन दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी विचारपूस केली असता ज्योत्सनाच्या चारित्र्यावर संशय असल्याने तिला अमरावती येथून दुचाकीवर बसवून सत्याग्रही घाटात आणले तेथे दोघांत वाद झाला असता ज्योत्सनाला दगडाने ठेचून पेट्राेल टाकून जाळल्याचे मनिषने सांगितले.
आरोपी मनिष भोसले हा मुख्य आरोपी असून याच्यावर जबरी चोरी, दरोडा, खुनाचा प्रयत्न गंभीर दुखापत, दारुबंदी आदी विविध गंभीर असे दहा गुन्हे यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांत दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
धक्कादायक हत्याकांडाचा उलगडा करुन आरोपींना गजाआड केल्यानंतर पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी संपूर्ण टिमला ५० हजार रुपयांचा रिवॉर्ड जाहीर केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.