चेतन व्यास
wardha Crime News: वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव येथील नाचाणगाव चौकात असलेल्या अभय ट्रेडिंग कंपनीत स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने मोठी कारवाई केली आहे. या पथकाने रेशनच्या तांदळाची साठवणूक काळाबाजार करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Latest Marathi News)
वर्ध्यातील स्थानिक गुन्हे शाखेने ८८ हजार १५५ किलो तांदूळ आणि तीन ट्रक असा एकूण ४५ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणात पोलिसांनी आरोपी महेश श्यामलाल अग्रवाल याच्याविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम ३,७ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
मिळालेल्या माहितीनुसार, पुलगाव येथील नाचणगाव चौकातील अभय ट्रेंडींग कंपनीतून रेशनच्या तांदळाचा काळाबाजार मागील अनेक वर्षांपासून सुरु होता. पुलगाव पोलिसांनाही याबाबत अवगत होते. मात्र, पोलिसांना पुरावे मिळत नसल्याचे कारण पुढे केले जात होते.
अखेर पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या आदेशान्वये महेश अग्रवाल याच्या कारखान्यावर छापा मारला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात रेशनिंगचा तांदूळ आढळून आला.
तालुका पुरवठा निरीक्षक पल्लवी बेलखोडे यांनी दिलेल्या अहवालानुसार पोलिसांनी आरोपी महेश अग्रवालविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम ३,७ अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.
पुलगाव शहर हे रेशनच्या तांदळाचा काळाबाजार करण्याचे हब म्हणून विदर्भात प्रसिद्ध आहे. पोलिसांनी टाकलेल्या धाडीत स्वस्त धान्य दुकानातील तांदूळचा काळाबाजार होत असल्याचे उघड झाले.
अन्न व पुरवठा विभागाकडून या प्रकरणाला आता वेगळे वळण दिल्या जात असल्याचे पुढे येत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल होताच अग्रवाल यांना चौकशीसाठी बोलावून त्यानंतर सूचनापत्रावर सोडल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजपूत यांनी दिली.
तांदळाचा एवढामोठा काळाबाजार पोलिसांनी पकडला ही कौतुकास्पद बाब आहे. पण, आरोपीला अटक न करता सूचनापत्रावर सोडून दिल्याने नागरिकांत उलटसुलट चर्चांना पेव फुटले आहे.
आरोपी महेश अग्रवाल हा जिल्ह्यातील विविध भागातून रेशनचा तांदूळ उचलायचा. त्यानंतर बारदाने बदली करुन त्यात तांदूळ भरून छत्तीसगड येथील राजनांदगाव येथे पाठवायचा. जेव्हा पोलिसांनी कारवाई केली तेव्हा तांदूळ साखरेच्या बारदान्यात भरला असल्याचे पुढे आले. पुढे तो तांदुळ शासकीय तांदळाच्या पोत्यात रिपॉलिशींग करुन मिक्स करुन पुन्हा मार्केटमध्ये विक्रीला यायचा. हा गोरखधंदा मागील अनेक वर्षांपासून सुरु होता, अशी माहिती हाती आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.