भरत मोहळकर, साम टीव्ही प्रतिनिधी
विधानपरिषद निवडणुकीपूर्वी महायुती आणि महाविकास आघाडीने कंबर कसलीय. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांनी क्रॉस व्होटिंगचा धसका घेतलाय. त्यामुळे मुंबईत हॉटेल पॉलिटिक्स रंगलंय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट..
विधानपरिषद निवडणुकीत मतांची फोडाफोडी टाळण्यासाठी महायुतीतील तिन्ही पक्ष सावध झालेत. तर आमदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी शिंदे गट, अजित पवारांची राष्ट्रवादी आमदारांची शाही बडदास्त ठेवण्यासाठी मुंबईत हॉटेल पॉलिटिक्स रंगलंय.
ठाकरे गटाच्या आमदारांना परळच्या ITC हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची अंधेरीतील द ललित ह़ॉटेलमध्ये सोय करण्यात आली आहे. त्याबरोबरच भाजपच्या आमदारांना ताज प्रेसिडेन्सी हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. तर शिंदे गटाच्या आमदारांना हॉटेल ताज लँड्स एण्ड या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे.
2022 मध्ये विधानपरिषद निवडणुकीवेळी झालेल्या क्रॉस वोटिंगमुळे भाजपचा चौथा उमेदवार विजयी झाला होता. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. त्यातच विधानपरिषदेच्या निवडणूकीत महायुतीचे 9 उमेदवार रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार रिंगणात उतरवल्याने निवडणूकीत रंगत आलीय. त्यापार्श्वभुमीवर मतांची आकडेवारीनुसार भाजपचे 5, शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 तर शेकाप आणि ठाकरे गटाचा प्रत्येकी 1 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे संख्याबळाचं गणित जुळवताना महायुती आणि महाविकास आघाडीचा कस लागणार आहे.
विधानपरिषदेत प्रत्येक जागेसाठी 23 मतांचा कोटा ठरवण्यात आला आहे. त्याबरोबरच या निवडणूकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यानं निवडणूकीत चुरस वाढलीय. यात काँग्रेसचे 37 आमदार आहेत. शरद पवारांच्या पक्षाचे 10 आमदार आहेत. ठाकरे गटाकडे 15 आमदार आहेत. त्यामुळे संख्याबळ पाहता महाविकास आघाडीचे 3 उमेदवार निवडणूक येण्याची शक्यता आहे. तर महायुतीचे 8 उमेदवार निवडूण येऊ शकतात. मात्र भाजपने 5, शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने प्रत्येकी 2 तर ठाकरे गट, काँग्रेस आणि शेकापने प्रत्येकी 1 उमेदवार दिलाय. त्यामुळे फोडोफोडीची शक्यता आहे.
महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार रिंगणात उतरवल्यानं निवडणूक अटीतटीची झाली आहे. त्यातच शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत चलबिचल सुरु असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच हॉटेल पॉलिटिक्स रंगलंय. मात्र हे हॉटेल पॉलिटिक्स यशस्वी होणार की 2022 प्रमाणेच पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.